उत्तर काशी : चारधाम यात्रेतील यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बस रविवारी सायंकाळी उत्तर काशीनजीक दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान २५ जण ठार झाले. ही बस ३० प्रवाशांना घेऊन यमुनोत्रीला जात होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही बस यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरून यमुनोत्रीकडे जात होती. उत्तराखंड राज्याच्या हद्दीत दामता येथे ही बस दरीत कोसळली. बसमध्ये भाविक हे मध्य प्रदेशातील पन्ना येथील आहेत. अपघात झालेले ठिकाण हे उत्तर काशी ते देहरादून यांच्या दरम्यान आहे.
अपघाताचे वृत्त कळल्यानंतर उत्तर काशीचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक रुहेला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तीसपैकी १५ प्रवासी मरण पावल्याची भीती आधी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, अपघातग्रस्त बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपघातस्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) पथके पाठविली असून ही पथके स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य करीत आहेत. आम्ही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याही सतत संपर्कात आहोत, असे धामी म्हणाले.
यमुनोत्रीसह गंगोत्री, बद्रीनाथ व केदारनाथ ही धार्मिक स्थळे चारधाम म्हणून ओळखली जातात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर म्हटले आहे की, या अपघातातील मृतांच्या वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तसेच जखमींच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून दिली जाईल.