२००८ साली मुंबईत झालेल्या २६/११ हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. सुमारे ३ दिवस मुंबई शहर पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांच्या जोखडात होतं. मरीन कमांडो, लष्कराचे जवान आणि मुंबई पोलिस यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. यात अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. ज्याला काही वर्षांनी फाशी देण्यात आली. या हल्ल्यात मुंबईच्या सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावणारे प्रवीण तेवतिया यांनी समाजासमोर आदर्श घालून दिला आहे. प्रवीण तेवतिया यांनी आपल्या मॅरेथॉन व इतर मेडलचा लिलाव करत करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दोन लाखांचा निधी उभा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००८ साली प्रवीण भारतीय नौदलाच्या MARCOS marine commandos मध्ये कार्यरत होते. मुंबईतल्या हॉटेल ताजमध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडोमध्ये प्रवीण सहभागी झाले होते. अतिरेक्यांशी लढताना…प्रवीण यांच्या छातीजवळ चार गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. डॉक्टरांनी उपचार करुन प्रवीण यांचा जीव वाचवला, परंतू या हल्ल्यात प्रवीण यांच्या कानाला कायमची दुखापत झाली. आजही त्यांना डाव्या कानाने ऐकताना त्रास होतो. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाग्रस्तांना मदत म्हणून निधी उभारण्याचं आवाहन केलं…यावेळी मी माझी आतापर्यंत कमावलेली ४० मेडल्स ऑनलाईन लिलावात दिली. आतापर्यंत काही मेडल्सचा लिलाव झाला असून मी यामधून २ लाखांचा निधी जमा केला आहे. हा निधी मी तात्काळ पंतप्रधान सहायता निधीमध्ये जमा केला.” प्रवीण इंडियन एक्स्प्रेसच्या संकेतस्थळाला माहिती देत होते.

या देशासाठी लढताना मी ही पदकं मिळवली होती. त्यामुळे सध्याच्या खडतर परिस्थितीत इतरांनी यातून प्रेरणा घेत अशीच मदत करावी अशी इच्छा प्रवीण यांनी बोलून दाखवली. तेवतिया सध्या उत्तर प्रदेशातील आपल्या घरात आई-वडिलांसोबत राहत आहेत. अतिरेकी हल्ल्यात जखमी झाल्यानंतर प्रवीण यांना डेस्क जॉब देण्यात आला. यानंतर प्रवीण यांनी आपल्या सर्व शारिरीक व्याधींवर मात करत मॅरेथॉनपटू बनण्याचा निर्णय घेतला. आजही प्रवीण जगभरातील अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26 11 hero auctions his marathon medals to raise funds for fight against covid 19 psd
First published on: 17-04-2020 at 15:09 IST