ब्रिटनचे राजपुत्र विल्यम आणि युवराज्ञी केट मिडलटन यांना सोमवारी मध्यरात्री पुत्ररत्न झाल्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्यातील पुरुषांच्या तीन पिढय़ा एकत्र नांदणार आहेत. १८९४ नंतर राजघराण्यातील वडील आणि नातू यांच्याबरोबर त्यांचे आजोबा हयात असण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजपुत्र चार्ल्स, त्यांचे चिरंजीव राजपुत्र विल्यम आणि आता राजघराण्यात नव्याने प्रविष्ट झालेले बाळ अशा तीन पिढय़ा आता इंग्लंडच्या राजवाडय़ात वावरणार आहेत. इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी ही सध्या ८७ वर्षांची असून, नवजात बाळालाही एवढेच आयुष्य लाभले, तर तो २१०० मध्ये इंग्लंडचा राजा असेल आणि २२ व्या शतकातील पहिला राजा ठरेल, असे द सन या दैनिकाने म्हटले आहे.
मुलाच्या जन्मामुळे युवराज विल्यमही आनंदित झाले असून राजघराण्याला ब्रिटीश सिंहासनाचा वारसदार मिळाला आहे. बाळबाळंतीण सुखरूप असून बाळाचे वजन ८ पौंड ६ औंस आहे.
डचेस ऑफ केंब्रिज असलेल्या केट मिडलटन हिने सेंट पॅट्रिक दिनाच्या संचलनावेळी हॅम्पशायर येथे एका ब्रिटीश सैनिकाशी बोलताना आपल्याला पुत्र व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्याचवेळी युवराज विल्यम यांना मुलगी हवी आहे, असेही तिने सांगितले होते. एकूण दहा तासांच्या प्रसववेदना सहन केल्यानंतर केट मिडलटन हिने भावी राजाला जन्म दिला. त्याचे नाव काय ठेवायचे हे अजून ठरलेले नसले तरीही बुकींमध्ये जेम्स व जॉर्ज या संभाव्य नावांवर सट्टा लागला आहे.
युवराज विल्यम रॉयल एअर फोसर्ममध्ये वैमानिक असून तो सध्या दोन आठवडय़ांच्या पितृत्व रजेवर आहे. पॅडिंग्टन येथील सेंट मेरीज हॉस्पिटलच्या लिंडो विंगमध्ये केटने बाळाला जन्म दिला त्यावेळी तो तिथे रात्रभर उपस्थित होता. ब्रिटनवासीयांना राजघराण्याच्या या वारसाची बरीच प्रतीक्षा होती, त्याचे वर्णन ‘ग्रेट केट वेट’ असे केले गेले होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिथे गर्दी केली होती. १५० दूरचित्रवाणी वाहिन्या व ३०० छायाचित्रकार तिथे बाळाच्या जन्माची घोषणा ऐकण्यासाठी तिष्ठत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचे डॉक्टर सुनीत गोडांबे यांची मोठी मदत
ब्रिटनची युवराज्ञी केट मिडलटन हिच्या या बाळंतपणात मुंबईचे सल्लागार बालजन्मतज्ज्ञ (निओनॅटोलॉजिस्ट) सुनीत गोडांबे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. स्त्रीरोगतज्ज्ञ मारकस सेशेल हे केट मिडलटन हिच्या दहा तासांच्या बाळंतपणाच्या संपूर्ण प्रक्रियेचे प्रमुख सूत्रधार डॉक्टर होते.

पणजी आणि पणतू यांची दुर्मीळ भेट
इग्लंडच्या राजघराण्याच्या गेल्या दोन शतकांच्या इतिहासात पणजीने पणतूचा चेहरा पाहण्याची ही दुसरी वेळ. राणी व्हिक्टोरिया हिचे चिरंजीव राजपुत्र एडवर्ड, त्यांचा मुलगा जॉर्ज आणि जॉर्ज यांचा सुपुत्र एडवर्ड अशा चार पिढय़ा राजवाडय़ात एकत्र नांदल्या होत्या.

याच दिवशी जन्मलेल्यांना चांदीच्या नाण्यांची भेट
राजपुत्र विल्यम आणि केट मिडल्टन या दाम्पत्यास झालेल्या पुत्ररत्नाच्या जन्मदिनीच जन्माला आलेल्या इंग्लंडमधील इतर बाळांना ‘ब्रिटिश रॉयल मिंट’तर्फे चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात येणार आहे. याच दिवशी जन्माला आलेल्या बाळांच्या पालकांनी फेसबुकवर चांदीच्या नाण्यासाठी नोंद करावी, असे आवाहन टांकसाळीचे संचालक शेन बिस्सेट यांनी केले आहे.

नियमांत बदल
२५ एप्रिल, २०१३ रोजी राजघराण्याच्या वारसा नियमांत बदल करण्यात आला होता. यापूर्वी राजघराण्यात युवराजांना पहिली मुलगी झाल्यास तिला राजघराण्याची वारस म्हटले जात नसे, उलट तिच्यापेक्षा लहान असलेल्या पुत्राला हा मान मिळत असे. मात्र नव्या नियमानुसार युवराजांना मुलगा किंवा मुलगी असे कोणीही झाले तरीही त्या बाळालाच यापुढे राजघराण्याचा वारस होण्याची म्हणजेच भविष्यात राजा होण्याची संधी मिळणार आहे. जुन्या नियमामुळे युवराज अँड्रय़ू आणि एडवर्ड यांना युवराज्ञी अ‍ॅनी हिच्यापेक्षा लहान असूनही हा मान मिळाला होता. मात्र, राष्ट्रकुलातील १५ देशांची मान्यता मिळाल्यानंतरच या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 direct male heirs to throne alive for 1st time since
First published on: 24-07-2013 at 01:43 IST