एकाच नवजात बालकावर एक, दोन नाही तर तिघांनी दावा केल्याने कोलकातामधील रुग्णालय संभ्रमात पडलं. बाळाचा नेमका बाप कोण ? हा प्रश्न त्यांना पडला. रविवारी हे बाळ जन्माला आलं. बाळाची आई बेशुद्ध असल्याने हे कोडं आता कसं सोडवायचं कसं हा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला होता. पण अखेर पोलिसांच्या मदतीने हा गुंता सोडवण्यात आला.

शनिवारी हे नाट्य सुरु झालं. प्रसुतीसाठी २१ वर्षीय महिलेला आयआरआयएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तिची आई आणि एक पुरुष सोबत होता. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात येत असताना त्या व्यक्तीने पैसे भरले आणि आपण महिलेचा पती असल्याचा दावा केला. तोपर्यंत सर्व काही ठीक सुरु होतं. पण त्याचवेळी अजून एक व्यक्ती रुग्णालयात पोहोचली आणि आपणच तिचा पती असून तिला भेटायचं असल्याचं सांगू लागला.

गोंधळात पडलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला आधीच एक व्यक्ती रुग्णालयात उपस्थित असून त्याने आपण महिलेचे पती असल्याचं सांगत फॉर्म भरला आहे आणि महिलेचा पती म्हणून फॉर्मवर स्वाक्षरीही असल्याची माहिती दिली. महिला प्रसुतीगृहात असल्या कारणाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला कुटुंबाकडे नेलं.

यानंतर मुलाचा बाप असल्याचा दावा करणाऱ्या दोघांनी रुग्णालयातच मारामारी करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयाबाहेर नेलं. पूर्वकाळजी म्हणून पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश करण्यास बंदी घातली.

रुग्णालयाबाहेर हा सगळा गोंधळ सुरु असतानाच महिलेने मुलीला जन्म दिला. यादरम्यान पोलिसांनी बाळाचा बाप असल्याचा दावा करणाऱ्या दोघांची चौकशी करत लग्नाचा पुरावा मागितला. यानंतर दुसऱ्या व्यक्तीने संध्याकाळी लग्नाचं प्रमाणपत्र आणलं तर पहिल्या व्यक्तीने आपण फक्त मित्र असल्याची कबुली दिली.

पण लग्नाचं प्रमाणपत्र समोर आल्यानंतही रहस्य उलगडलं नव्हतं. महिलेच्या आईने हा व्यक्ती आपला जावई असल्याचं मानण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी थेट महिलेकडूनच यासंबंधी माहिती घेत रहस्य उलगडण्याचं ठरवलं. पण महिला अद्यापही बेशुद्ध होती. गोंधळ संपवण्यासाठी पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात बोलावलं आणि महिलेच्या उपस्थितीत जबाब नोंदवण्याचं ठरवलं.

सगळं काही सुरळीत सुरु असतानाच अजून एक व्यक्ती तिथे आली आणि आपण महिलेचे पती नाही पण मुल आपलं आहे असा दावा केला. हे सर्व गोंधळात टाकणारं असल्या कारणाने पोलिसांनी महिलेशी बोलणंच सर्वात योग्य होईल असं ठरवलं. मध्यरात्रीपर्यंत हे नाट्य सुरु होतं. अखेर पोलिसांना महिलेचा जबाब नोंदवण्याची परवानगी मिळाली.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘महिलेने अजिबात वेळ न दवडता दुसरी व्यक्ती आपला पती असून, आपल्या मुलीचा बाप असल्याचं सांगितलं’. आपल्या संबंधांवर बोलताना एप्रिल महिन्यात आपलं लग्न झाल्याचं महिलेने सांगितलं. आपलं नातं थोडं विचित्र असल्याचंही तिने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पत्नी म्हणून आपला स्वीकार करण्यास नकार दिल्याने आपण त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्याने लग्न केलं होतं”, अशी माहिती महिलेने दिली आहे. आमच्या दोघांची भेट क्लबमध्ये झाली होती. माझ्यापासून गरोदर राहिल्यानंतर आपण तिच्याकडे वेळ मागितला होता. पण तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती असं महिलेच्या पतीने सांगितलं आहे. “आम्ही लग्न केलं होतं. पण कुटुंबाने स्वीकारण्यास नकार दिल्याने वेगळे राहत होतो”, असंही त्याने सांगितलं. पत्नीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर आपण बाप झालो असल्याची माहिती मिळाल्याचं त्यानं पुढे सांगितलं.