Santhara Ritual in Jainism : मध्य प्रदेशातील इंदूरमधील आध्यात्मिक गुरूच्या सल्ल्यानुसार पालकांनी ब्रेन ट्युमर झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर जैन धार्मिक विधी केला. यामुळे या मुलीचा मृत्यू झाला आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. वियाना जैन असं या चिमुकलीचं नाव होतं. २१ मार्च रोजी तिने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली.

संथारा किंवा सल्लेखाना असं या जैन धर्मातील एका विधीचं नाव आहे. या विधीनुसार स्वेच्छेने मृत्यूपर्यंत उपवास केला जातो. या प्रथेनुसार, आध्यात्मिक शुद्धीकरण आणि जगापासून अलिप्तता मिळविण्यासाठी व्यक्ती मृत्यूपर्यंत अन्न आणि पाण्याचे सेवन हळूहळू कमी करते. वयाच्या तिसऱ्याच वर्षीय वियानाने ही उपासना केल्याने तिची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून जैन विधी संथारा व्रत करणारी ती जगातील सर्वांत लहान मुलगी ठरली.

मुलीचा अंत जवळ आलाय त्यामुळे….

शनिवारी पीटीआयशी बोलताना मुलीचे वडील पीयूष जैन म्हणाले, “माझ्या मुलीला या वर्षी जानेवारीमध्ये ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पण मार्चमध्ये तिची प्रकृती बिघडली आणि तिला खाण्यापिण्यात अडचण येऊ लागली.” २१ मार्चच्या रात्री, पालकांनी तिला जैन भिक्षू राजेश मुनी महाराज यांच्याकडे दर्शनासाठी नेले. “महाराजांनी माझ्या मुलीची अवस्था पाहिली आणि आम्हाला सांगितले की मुलीचा अंत जवळ आला आहे आणि तिला संथारा व्रत करायला हवे. जैन धर्मात या व्रताला खूप महत्त्व आहे. त्याबद्दल विचार केल्यानंतर, आम्ही शेवटी ते करण्यास सहमती दर्शविली”, असं चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलं.

गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले

जैन म्हणाले की, साधूने संथारा धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर काही मिनिटांतच मुलीचा मृत्यू झाला. त्यांनी असेही सांगितले की त्यांच्या मुलीचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने नोंदवले आहे आणि जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र जारी केले आहे ज्यामध्ये तिचे नाव “जैन विधी संथारा व्रत करणारी जगातील सर्वात तरुण व्यक्ती” म्हणून नमूद केले आहे.

तिची आई वर्षा जैन म्हणाल्या, “माझ्या मुलीला संथारा व्रत करायला लावण्याचा निर्णय किती कठीण होता हे मी वर्णन करू शकत नाही. माझ्या मुलीला ब्रेन ट्यूमरमुळे खूप त्रास होत होता. तिला या अवस्थेत पाहणे माझ्यासाठी खूप वेदनादायक होते.” वियानाची आठवण येताच तिची आई भावुक झाली आणि म्हणाली, “माझी मुलगी तिच्या पुढच्या जन्मात नेहमीच आनंदी राहावी अशी माझी इच्छा आहे.”

संथारा प्रथा काय आहे?

जैन समुदायाच्या धार्मिक परिभाषेत संथाराला ‘सल्लेखाना’ आणि ‘समाधी मारन’ असेही म्हणतात. या प्राचीन प्रथेनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की अंत आला आहे तेव्हा तो अन्न, पाणी आणि सांसारिक गोष्टींचा त्याग करून मृत्यूला आलिंगन देतो.

संथाराला कायदेशीर मान्यता आहे का?

२०१५ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) अंतर्गत संथारा प्रथेला दंडनीय गुन्हा घोषित केला होता. परंतु, यानंतर कायदेशीर आणि धार्मिक वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला. जैन समुदायाच्या विविध धार्मिक संस्थांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अखेर, सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.