Bullet Train Project Update : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (Bullet Train Project) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने ३०० किमीचे व्हायाडक्टचे काम पूर्ण करून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी केली. त्यांनी एक्सवर यासंदर्भातील व्हिडिओही पोस्ट केला आहे. व्हायाडक्ट म्हणजे नदीवर वाहतुकीसाठी बांधण्यात येणारे पूल.

नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिडेटद्वारे (NHSRCL) राबविण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये NHSRCL ने कॉरिडॉरवर १०० किमीचा व्हायाडक्ट आणि २५० किमीचा घाट बांधण्याचे काम पूर्ण केले होते.

या नद्यांवर बांधले व्हायाडक्ट

NHSRCL च्या मते गुजरातमधील सहा प्रमुख नद्यांवर व्हायाडक्टच्या कामात पार, पूर्णा, मिंधोला, अंबिका, औरंगा, वेंगानिया या नद्यांवरील बांधकामांचा समावेश आहे. या नद्या वलसाड आणि नवसारी जिल्ह्यातील आहेत. व्हायाडक्ट ४० मीटर लांबीचे पूर्ण स्पॅन बॉक्स गर्डर आणि सेगमेंटल गर्डर वापरून बांधले आहेत आणि बांधलेल्या भागांवर आवाज रोखणारे अडथळे आधीच बसवले जात आहेत. इतर बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाने वलसाडमध्ये ३५० मीटर लांबीचा बोगदा यशस्वीरित्या खोदला असून सुरतमध्ये २८ नियोजित स्टील पुलांपैकी पहिला ७० मीटर लांबीचा पूल बांधला आहे.

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी १४ सप्टेंबर २०१७ रोजी केली होती. फेब्रुवारी २०१६ मध्ये स्थापन झालेली NHSRCL केंद्र सरकार तसंच गुजरात आणि महाराष्ट्र राज्य सरकारंच्या इक्विटी सहभागासह रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत एक विशेष संस्था म्हणून काम करते. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दोन्ही राज्यांमधील प्रवासाचा वेळ कमी हणार आहे.