५२ वर्षीय पत्नीची हत्या केल्याप्रकरणी ३२ वर्षीय पतीला केरळमधील सत्र न्यायालायने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लग्नाच्या दोनच महिन्यानंतर आरोपीने पत्नीची हत्या केली होती. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सखा कुमारी (५२) अविवाहित श्रीमंत महिला होती. तिला लग्नात अजिबात रस नव्हता. पण तिची ओळख पेशाने इलेक्ट्रिशिअन असलेल्या अरुण (२८) याच्याशी झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न केलं.

दरम्यान, अरुणने तिच्या संपत्तीकडे बघून हे लग्न केल्याचा दावा वकिलांनी केला. सखा कुमारीच्या ख्रिश्चन परंपरेनुसार हे लग्न व्हावं अशी कुमारची इच्छा होती. तर, या लग्नाचे फोटो कुठेही शेअर न करण्याची विनंतीही अरुणने केली होती.

सरकारी वकील परसला ए अजीकुमार म्हणाले की, अरुणने लग्नासाठी ५० लाख रुपये आणि १०० सोन्याच्या तोळ्यांची मागणी केली होती. लग्नापूर्वीही त्याने कुमारीकडून भरपूर पैसे घेतले होते. तिच्या पैशांतूनच त्याने एक महागडी कार आणि दुचाकी खरेदी केली होती. तर, कुमारीची एकच इच्छा होती. तिला तिच्या संपत्तीला वारसदार म्हणून मूल हवं होतं. पण, हे मूल देण्यास अरुणने नकार दिला.

आरोपीला २ लाखांचा दंड

एकदा बाळाच्या आग्रहावरून दोघांमध्ये भांडण झालं. त्यामुळे संतापलेल्या अरुणने एका कापडाने कुमारीचा गळा दाबला. ती बेशुद्ध पडल्यानंतर तिला विजेचा शॉकही देण्यात आला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. २५ डिसेंबर २०२० रोजी हा गुन्हा घडला. तर, २६ डिसेंबर २०२० रोजी हा गुन्हा उघडकीस आला. हे प्रकरण नंतर अतिरिक्त सत्र न्यायालयात गेलं. तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील नेय्याटिंकारा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अथियान्नूर येथील रहिवासी अरुणला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तर त्याला २ लाखांचा दंडही ठोठावला आहे.