scorecardresearch

“मला न्याय हवाय…” वडिलांच्या हत्येनंतर चार वर्षांच्या मुलाची मोदींकडे मागणी

वडिलांची निर्घृण हत्या झाली तेव्हा हा लहानगा फक्त तीन महिन्यांचा होता.

4-year-old-assam-boy-seeks-justice-pm-narendra-modi-his-father-murder-gst-97
ट्विटरवर रिझवानने आपला ४५ सेकंदांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. (Photo : Twitter)

आसामच्या कचर जिल्ह्यातील अवघ्या चार वर्षांच्या मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चार वर्षांपूर्वी झालेल्या आपल्या वडिलांच्या हत्येबाबत न्याय मागितला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडे या लहानग्या मुलाने आपल्या वडिलांच्या हत्याप्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. २६ डिसेंबर २०१६ रोजी आसामच्या कचर जिल्ह्यातील सिलचर शहरात रिझवान साहिद लासकर या मुलाचे वडील सैदुल अलोम लास्कर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी, हा मुलगा फक्त तीन महिन्यांचा होता.

ट्विटरवर रिझवानने आपला ४५ सेकंदांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ‘मला न्याय हवा आहे’ असं लिहिलेला फलक हातात घेतला असून पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि सरमा यांच्याकडे आपल्या वडिलांच्या हत्या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. “माझं नाव रिझवान साहिद लास्कर आहे. महोदय, मी जेव्हा ३ महिन्यांचा होतो तेव्हा म्हणजेच २६ डिसेंबर २०१६ रोजी माझ्या वडिलांची ११ बदमाशांनी निर्घृण हत्या केली होती. आता मी पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विनंती करतो की, या प्रकरणाची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा”, असं रिझवानने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

वाळू माफियांकडून हत्या

अहवालानुसार, रिझवानचे वडील कंत्राटदार होते आणि वाळू माफियांनी त्यांच्या कार्यालयाजवळ कथितपणे त्यांची हत्या केली होती. जन्नतुल फेरदौसी लासकर या त्यांच्या पत्नीने कचर जिल्हा पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली. या तक्रारीत जन्नतुल यांनी आपल्या पतीच्या हत्येत ११ जणांचा कथित सहभाग असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या प्रकरणी कचर पोलिसांकडून भारतीय दंड संहिते अंतर्गत (आयपीएल) अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

आरोपी अजूनही आमच्या घराजवळ फिरतात!

“माझ्या पतीला मारण्यासाठी त्यांनी लोखंडी रॉड आणि इतरही शस्त्रं वापरली होती. पोलिसांनी त्यापैकी नऊ जणांना अटक केली आहे. परंतु, दोन जणांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही”,असं रिझवानच्या आई जन्नतुल फेरदौसी लास्कर यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितलं आहे. “आरोपी अजूनही आमच्या घराजवळ फिरत आहेत. आम्ही पूर्णपणे असुरक्षित आहोत. आम्हाला न्याय हवा आहे”, अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

रिझवानचे काका मोहिदुल हक लास्कर म्हणाले की, त्यांनी आपल्या पुतण्याला ट्विटरवर अकाऊंट उघडण्यासाठी आणि वडिलांच्या हत्येबाबत न्याय मागण्याकरिता व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मदत केली. त्याचप्रमाणे, या प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली. पण त्या आरोपींना अटकपूर्व जामीन देखील मिळाला, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2021 at 14:29 IST

संबंधित बातम्या