उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यूच्या तापामुळे १० दिवसात सुमारे ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १८६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात सुमारे ४५ मुले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच फिरोजाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वॉर्डमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू झाल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा एका आठवड्यासाठी बंद केल्या आहेत.

फिरोजाबादमध्ये आतापर्यंत डेंग्यू आणि तापामुळे ४५ मुलांचा मृत्यू झाला आहे, तर ८ नागरिक या तापाचे बळी ठरले आहेत. सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची अचानक पाहणी केली, तर तेथे त्यांनी आरोग्य सेवांचाही आढावा घेतला.

डेंग्यू आणि तापाने त्रस्त असलेल्या शेकडो मुलांवर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात आणि गावातही उपचार सुरू आहेत. डेंग्यूची वाढती प्रकरणे पाहता जिल्हा दंडाधिकारी चंद्र विजय यांनी ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पर्यंत इयत्ता १ली ते ८वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, डेंग्यूच्या वाढत्या घटनांमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही शाळाचालकाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिरोजाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचे दृश्य अतिशय हृदयद्रावक आहे. तापाने ग्रस्त मुले वॉर्डमध्ये भरलेली आहेत. ४५ मुलांच्या मृत्यूमुळे आजारी मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.