महाराष्ट्रातील पाच आमदार काश्मिरमध्ये बाँबहल्ल्यात बचावले आहेत. अनंतनाग जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हे बाँब फेकण्यात आल्याचे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले. गाड्यांचे टायर यात फुटले, एका गाडीच्या काचा तडकल्या परंतु सुदैवानं कुणालाही हानी झाली नाही. आज बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला असून या आमदारांना आता जास्त सुरक्षा देण्यात आली आहे.

दीपक चव्हाण, विक्रम काळे, सुधीर पारवे, सुरेशअप्पा पाटील आणि तुकाराम काते अशी या आमदारांची नावे आहेत. पंचायत राज समितीच्या कामानिमित्त हे सर्व आमदार जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. सुदैवाने पाचही आमदार सुखरुप आहेत. आमदार विक्रम काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अनंतनाग येथून जात असताना अचानक आम्हाला मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला. सुरुवातीला आम्हाला टायर फुटला असावा असं वाटलं. मात्र अचानक लोकांची धावपळ सुरु झाल्याचं आम्ही पाहिलं. आमच्यासोबात पोलिसांची एक गाडीदेखील होती. आम्ही आमची गाडी न थांबवता तेथून वेगाने पुढे निघालो. सुरक्षितस्थळी गेल्यानंतर पाहिलं तेव्हा आमच्या गाडीचा टायर फुटला होता. पोलिसांच्या गाडीला गोळ्या लागल्याचं दिसत होतं.”

विक्रम काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २० जणांचा समावेश या ताफ्यात होता. सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत. मात्र, या वेळी या भागामध्ये रस्त्यावर असलेल्यांपैकी सात ते आठ जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. श्रीनगरला पोहोचल्यानंतर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना घटनेसंबंधी माहिती दिली. यानंतर सर्व आमदारांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे.