5 Pakistani Soldiers Killed On Afghan Border: अफगाणिस्तान सीमेजवळ झालेल्या चकमकीत पाच पाकिस्तानी सैनिक आणि २५ दहशतवादी ठार झाल्याचे पाकिस्तानी लष्कराने रविवारी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्यात आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला लष्करी संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांचे शिष्टमंडळ इस्तंबूलमध्ये शांतता करारावर चर्चा करत आहे. त्यादरम्यान ही घटना घडली आहे. कालच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी, जर शांतता करार झाला नाही, तर पाकिस्तान उघड युद्ध करेल असा इशारा दिला होता.
पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की, शुक्रवारी आणि शनिवारी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातून पाकिस्तानच्या कुर्रम आणि उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानच्या लष्करी मीडिया विभागाने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, “या घुसखोरीमुळे अफगाणिस्तानातून निर्माण होणाऱ्या दहशतवादाच्या समस्येला तोंड देण्याच्या त्यांच्या हेतूंबद्दल शंका निर्माण झाली आहे.”
काय म्हणाले होते पाकिस्तानचे संरक्षण मंत्री?
इस्तंबूलमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात काल आणि आज झालेल्या शांतता चर्चेत जर कोणताही करार झाला नाही तर पाकिस्तान “उघडपणे युद्ध” सुरू करेल, असा इशारा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काल अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला दिला होता.
“या चर्चेत जर कोणताही करार झाला नाही तर आमच्याकडे त्यांच्याशी उघड युद्ध करण्याचा पर्याय आहे. पण मी पाहिले की त्यांना शांतता हवी आहे”, असे ख्वाजा असिफ म्हटल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले होते. तुर्कीच्या इस्तंबूलमधील शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हे वक्तव्य केले होते.
अफगाणिस्तान-पाकिस्तान लष्करी संघर्ष
२०२१ मध्ये तालिबानने अफिगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासूनच्या त्यांचा पाकिस्तानशी झालेला सध्याचा लष्करी तणाव सर्वात मोठा आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी हा तणाव शांत करण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे.
चर्चेची पहिली फेरी १९ ऑक्टोबर रोजी दोहा येथे झाली होती. कतार आणि तुर्कीने या चर्चेचे आयोजन केले होते. त्यावेळी २५ ऑक्टोबर रोजी इस्तंबूलमध्ये पुन्हा चर्चा करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले होते.
अफगाणिस्तानातील सुरक्षि ठिकाणी राहून हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर हा लष्करी संघर्ष सुरू झाला होता.
तालिबान सरकारने पाकिस्तानवर अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि पूर्व अफगाणिस्तानातील एका बाजारपेठेत हवाई हल्ले केल्याचा आरोप केल्यानंतर हा तणाव आणखी वाढला होता. पाकिस्तानने यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी तळ असल्याचे सांगून हल्ले सुरू केले होते.
दोहामधील शांतता चर्चेनंतर, पाकिस्तानने गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात नवीन हवाई हल्ले केले होते. ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश होता.
