Gwalior rape Case Crime News : एका ५ वर्षीय चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या किशोरवयीन आरोपीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या शिवपुरी येथे घडल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली असून पीडित मुलीवर ग्वाल्हेरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथे ती मृत्यूशी झुंज देत आहे. या अल्पवयीन पीडितेला शरिरातील अंतर्गत अवयवांना जखमा, चावल्याच्या, डोके भिंतीवर आपटल्याच्या याबरोबरच गुप्तांगाला २८ टाके अशा अनेक जखमा असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दिली होती आणि त्यानंतर दोन तासांनी ती आढळून आली. तिच्या घरापासून जवळच एका बंद पडलेल्या घराच्या छतावर ही मुलगी बेशुद्ध आणि रक्तस्त्राव झालेल्या अवस्थेत आढळून आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय शेजारी दारूच्या नशेत मुलीला अमिष दाखवून घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलीवर उपचार करणाऱ्या ग्वाल्हेरच्या कमला राजा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीचे डोके अनेक वेळा भिंतीवर आणि जमिनीवर आपटले, तिच्या चेहर्यावर आणि शरीरावर चावा घेतला आणि तिच्या गुप्तांगाचे जवळजवळ दोन भाग होतील इतक्या गंभीर जखमा केल्या.
रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर पीडितेच्या जीवघेण्या जखमांवर दोन तास ऑपरेशन करण्यात आले. डॉक्टरांना कृत्रिम गुदद्वार तयार करण्यासाठी तिचे मोठे आतडे कापावे लागले आणि युरीनरी कॅथेटर जोडावे लागले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असली तरी ती बेशुद्ध अवस्थेतच असून तिला क्रिटिकल केअरमध्ये ठेवण्यात आले आहे.
कठोर शिक्षेची मागणी
दरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आरोपीला कठोरात-कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. पीडितेच्या आजोबांनी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की आरोपी वयस्कर असून त्यांनी पोलिसांनी आरोपीची १७ वर्षीय अशी नोंद केल्याचा त्यांनी विरोध केला आहे.
२४ फेब्रुवारी रोजी या घटनेच्या विरोधात शिवपुरी येथे आंदोलन करण्यात आले, ज्यामध्ये नागरिकांबरोबर भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला होता. येथील खासदार आणि केंद्री मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या घटनेचा सोशल मीडियावर निषेध केला आहे तसेच कायद्या अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याच्यावर बाल गुन्हे कायद्यांतर्गत खटला चालवला जाईल. आरोपीचे अचूक वयाबाबत तपास केला जात आहे. भारताच्या बालगुन्हेगार कायद्यांतर्गत, १६-१८ वयोगटातील व्यक्तींवर गंभीर गुन्ह्यांसाठी प्रौढ म्हणून खटला चालवता येतो. याबद्दल पीडितेच्या कुटुंबियांकडून मागणी केली जात आहे.