१५७ कि.मी.च्या प्रकल्पासाठी ६३ हजार कोटींचा खर्च
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रवाशांना अत्याधुनिक व आरामदायी साधन उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम सुरू केले असून लवकरच सात मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी तब्बल ६२ हजार ९४३ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे १० हजार अभियंते व ४० हजार कुशल-अकुशल कामगारांना रोजगार मिळणार आहे.
एमएमआरडीएतर्फे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या १८.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-७ या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ६२०८ कोटी रुपये खर्च होणार असून त्यावर १७ स्थानके असतील. त्याचबरोबर दहिसर ते डी. एन. नगर या १६.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-२ अ या प्रकल्पाचे कामही सुरू आहे. त्यासाठी ६४१० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
याचबरोबर डी. एन. नगर ते मंडाले या २३.५ किलोमीटर लांबीची मेट्रो-२ ब, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या ३२ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-४ आणि स्वामी समर्थ नगर-विक्रोळी या १४.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-६ या तीन प्रकल्पांसाठी एकूण ३१ हजार १०१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या तिन्ही प्रकल्पांचे काम २०१८ मध्ये सुरू होणार आहे, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.
ठाणे-भिवंडी-कल्याण, वडाळा ते जीपीओ, अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व आणि दहिसर ते मीरा-भाईंदर या चार मेट्रो रेल्वेचे कामही हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १९ हजार २२५ कोटी रुपये खर्च होणार आहे. या सर्व मेट्रो रेल्वे प्रकल्पांमुळे २०२१ मध्ये मुंबई महानगर प्रदेशातील १६० हून अधिक स्थानकांवरून ४० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज आहे. या सर्व प्रकल्पांसाठीच्या वित्तीय पुरवठय़ाबाबत एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि आशियाई विकास बॅंकेच्या प्रतिनिधींची मागील आठवडय़ात बैठक झाली असून वित्त पुरवठय़ात अडचणीच्या ठरू शकणाऱ्या अटींमधून मेट्रो रेल्वे प्रकल्पांना सवलत देण्याची तयारी असल्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई महानगरात मेट्रो रेल्वेचे जाळे स्थापित झाल्यानंतर सध्या खासगी गाडय़ांमधून प्रवास करणारे ३० ते ३५ टक्के प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील, असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांचा ५० ते ७० टक्के वेळ वाचेल, असाही एमएमआरडीएचा दावा आहे.