लखनौ : राज्य सरकारच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरून सुमारे ५४ हजार बेकायदेशीर भोंगे हटवण्यात आले असून, ६० हजारांहून अधिक भोंग्यांचा आवाज परवानगी असलेल्या मर्यादेत बसवण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी दिली. धार्मिक स्थळांवरून अनधिकृत भोंगे हटवण्याची आणि इतर भोंग्यांचा आवाज मर्यादेत बसवण्याची राज्यव्यापी मोहीम २५ एप्रिलपासून सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत रविवार सकाळपर्यंत एकूण ५३,९४२ भोंगे हटवण्यात आले, तर ६०,२९५ भोंग्यांचा आवाज परवानगीयोग्य मर्यादेत बसवण्यात आला, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले. कुठलाही भेदभाव न करता सर्व धार्मिक स्थळांवरून हे भोंगे हटवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

 ही मोहीम आणखी काही दिवस चालणार असल्याच्या वृत्ताला गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

 ‘हटवण्यात येत असलेले भोंगे अनधिकृत आहेत. जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता किंवा जितक्या भोंग्यांसाठी परवानगी घेण्यात आली आहे त्यापेक्षा अधिक संख्येत असलेल्या भोंग्यांचे अनधिकृत म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. ध्वनिवर्धकांबाबत उच्च न्यायालयाने दिलेले आदेशही विचारात घेण्यात येत आहेत’, असे कुमार यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१७ सालच्या या आदेशानुसार, ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अन्वये अधिकाऱ्यांकडून लेखी परवानगी घेऊन धार्मिक व सार्वजनिक स्थळांवरील भोंगे बसवण्यात आले आहेत काय, असे उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला विचारले होते.