अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार अस्तित्वात आल्यापासून देशातील अल्पसंख्यांकाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अफगाणिस्तानात सत्ताबदल घडल्यानंतर अनेक नागरिकांनी भारतात आश्रय घेतला आहे. मात्र, आजही असंख्य नागरिक तालिबानी राजवटीत जगत आहेत. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत.

या घडामोडी सुरू असताना रविवारी ५५ अफगाणी शीख नागरिकांना भारतात आणण्यात आलं आहे. एका विशेष विमानाने त्यांना अफगाणिस्तानातून दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं आहे. तालिबानी राजवटीत त्रस्त झालेल्या अल्पसंख्यांकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकारने ५५ जणांना बाहेर काढलं आहे. संबंधित अफगाणी शीख नागरिकांनी भारतात पोहोचल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यावेळी काहीजणांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा मांडली आहे.

हेही वाचा- “आपण आत्महत्या करायची नाही, पण…” भाजपावर टीका करताना शरद पवारांचं विधान

अफगाणी शीख बलजीत सिंग म्हणाले की, अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मला चार महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं. तालिबान्यांनी आमची फसवणूक केली असून त्यांनी तुरुंगात आमचे केस कापले. मी भारतात आणि माझ्या धर्मात परतल्याबद्दल खूप आनंदी आहे.

हेही वाचा- राजस्थानमध्ये राजकीय वादळ; काँग्रेसच्या ८२ आमदारांचा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही भारत सरकारचे खूप आभारी आहोत. त्यांनी आम्हाला तातडीचा व्हिसा दिला आणि आम्हाला भारतात पोहोचण्यास मदत केली. आमच्यापैकी अनेकांची कुटुंबे अजूनही अफगाणिस्तानात राहिली आहेत. सुमारे ३०-३५ लोकं अजूनही अफगाणिस्तानात अडकले आहेत”, अशी प्रतिक्रिया अफगाणी शीख सुखबीर सिंग खालसा यांनी दिली आहे.