6 arrested for killing disabled man to claim Rs 5.25 crore insurance money Crime News : कर्नाटकच्या होसपेट येथे पैशांसाठी एका अपंग व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर या प्रकरणात शुक्रवारी ६ जणांना अटक करण्यात आले आहे. या घटनेत अपंग व्यक्तीचा खून करून तो दुचाकी अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृत व्यक्तीच्या नावावर घेतलेल्या अनेक विमा पॉलिसीतून मिळणाऱ्या ५.२५ कोटी रुपयांवर दावा करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचे नाव गंगाधर (३४) असे होते आणि तो होसापेट येथील कौलपेटचा रहिवासी होती. त्यांची बुधवारी सह जणांच्या टोळीने मिळून हत्या केली, ज्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे आणि ती त्याची पत्नी असल्याचे ढोंग करत होती.
कृष्णाप्पा, रवी गोसांगी, अजेय, रियाज, योगराज सिंह आणि हुलिगेम्मा अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्ह्यासाठी कथितरित्या वापरलेली कार आणि मोटारसायकल देखील जप्त केली आहे.
तपासकर्त्यांनी सांगितलं की ही घटना विजयनगर जिल्ह्यातील होसापेट येथे बुधवारी घडली. एका बोथड वस्तूने गंगाधर याला मारहाण केल्यानंतर आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी त्यांचा मृतदेह घेऊन होसापेटच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या जांबूनाथ गावजवळच्या रस्त्यावर घेऊन गेले. पोलिसांनी सांगितले की त्यांनी सेकंड हँड बजाज एक्सेल मोटारसायकल भाड्याने घेतली, मृतदेह त्यावर ठेवला आणि त्यानंतर मुद्दाम कारने त्याला धडक दिली, जेणेकरून भीषण अपघात झाला असल्याचे वाटेल. त्यानंतर आरोपी पळून गेले.
पण अधिकाऱ्यांना दुचाकीची चावी ही दुचाकीवरील एका पाकिटात आढळून आली, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. “जर हा अपघात असता, तर गाडीची चावी ही गाडीला लावलेली असते किंवा ती जवळपास कुठेतरी पडलेली असती, जेव्हा चावी पाकिटात सापडली तेव्हा आमचा संशय बळावला,” असे विजयनगरच्या एसपी एस. जान्हवी यांनी सांगितले.
अधिकच्या तपासात पोलिसांना आढळून आले की गंगाधर हा आजारी होता आणि तो आर्थिक संकटाशीही झुंजत होता. त्याचे लग्न झालेले असले तरी आरोपींनी सब-रजिस्ट्रार कार्यालयात त्याचे पुन्हा एकदा हुलगेम्माशी लग्न झाल्याचे नोंदवले. त्यांनी बनावट नॉमिनीजसह त्याच्या नावावर बँक खाती उघडली आणि अपघात विम्यासह विविध कंपन्यांकडून ५.२५ कोटी रुपयांपर्यंतच्या सहा विमा पॉलिसी काढल्या यादरम्यान ते नियमितपणे प्रिमियम भरत राहिले.
मास्टरमाइंड बँकेतील कर्मचारी
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या गुन्ह्यामागील सूत्रधार असलेला योगराज सिंह हा अॅक्सिस बँकेतील कर्मचारी आहे. तो अडचणीत सापडलेले व्यक्ती, निराधार, अनाथ आणि गंभीर आजारांनी ग्रस्त अशा लोकांना गाठायचा आणि त्यांच्या नावाने बँकेत खाती उघडायचा.
सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तो स्वतःच करत असे, आणि या खात्याच्या आधारे तो इन्शुरन्स पॉलिसी मिळवायचा, फेक नॉमिनीज तयार करायचा आमि सर्व कागदपत्रे ही पीडित व्यक्तीच्या नावावर दाखवायचा, असे पोलिसांनी सांगितले. त्याचा सहभाग असल्याचा आरोप असणाऱ्या इतर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही हत्या अपघातासाठीची इन्सुरन्स पॉलिसींच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी करण्यात आली होती. गंगाधरच्या पत्नीने याप्रकरणी तक्रार दाखल केली, ज्यामुळे तपास सुरू झाला.