पीटीआय, नवी दिल्ली
दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरातील मुघल बादशाह हुमायूनच्या कबरीजवळ एका दर्ग्याची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी ३.५५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
जखमींना एम्स रुग्णालय आणि एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे सहपोलीस आयुक्त संजय कुमार जैन यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा (डीएफएस), दिल्ली पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी अनेक भाविक दर्ग्यात जमले होते. मुसळधार पावसामुळे ते दर्ग्यातच थांबले होते. एका भिंतीवर भार आल्याने ती कोसळली आणि १० ते १२ जण ढिगाऱ्याखाली दबले गेले.