ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात एका तरुणीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, बांगिरीपोशी येथील तिच्या घरी दोन व्यक्ती आले आणि त्यांनी या तरुणीला एका कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या नोकरीच्या बहाण्याने हे आरोपी तिला एका व्हॅनमध्ये बसवून घेऊन गेले.

वाहन जसे पुढे जाऊ लागले आणखी काही पुरुष त्या व्हॅनमध्ये येऊन बसले. हे सर्वजण जवळपास ८० किमी दूर अंतरावर उडला-बालासोर राज्य माहामार्गावर एका निर्जन स्थळी पोहचल्यावर ते थांबले. त्यानंतर या वाहानात पाच जणांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

महिलेने जेव्हा आरडाओरड सुरू केली तेव्हा त्यांनी तिला वाहनातून बाहेर फेकून दिले आणि ते घटनास्थळावरून पसार झाले. स्थानिक नागरिकांना ही महिला आढळून आली आणि त्यांच्या मदतीने ती घरी परतली. जेव्हा तिने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला त्यांनी ताबडतोब उडला पोलिसांना याबद्दल माहिती दिली.

कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली, आम्ही या प्रकरणात दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या कुटुंबाने पाच व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या आम्ही यात सहभागी असलेल्या इतर तीन जणांना पकडण्यासाठी या प्रकरणाचा तपास करत आहोत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान अद्याप फरार असेलल्या तीन आरोपींना पकडण्यासाठी तपास सुरू आहे.