पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदींनी यावेळी भाषण करताना आपल्या सरकारने केलेल्या कामांची यादी तसंच योजनांमुळे मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी गरिबांसाठी मोफत तांदूळ, भविष्यातील वाटचाल, शिक्षण योजना अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला. मुख्यत्वे मोदींनी यावेळी ७५ वंदे भारत ट्रेन ७५ आठवड्यांत देशाच्या कानाकोपऱ्यांना जोडणार आहे अशी घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला दिलेल्या भाषणात ७५ वंदे भारत ट्रेन ७५ आठवड्यांच्या आत देशाच्या कानाकोपऱ्यांना जोडणार आहे अशी घोषणा केली आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेस देशातील दोन मार्गांवर धावत आहे. वंदे भारत सेमी हाय स्पीड ट्रेन मेक इन इंडिया धोरणांतर्गत बनवल्या जात आहेत आणि त्या ९० टक्के स्वदेशी आहेत.

देशाने संकल्प केला आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ७५ आठवड्यांत ७५ वंदे भारत गाड्या देशाच्या कानाकोपऱ्यात जोडल्या जातील. आज ज्या वेगाने देशात नवीन विमानतळे बांधली जात आहेत, दुर्गम भागांना जोडणारी विमानसेवेची योजना देखील अभूतपूर्व आहे. आधुनिक सुविधांसह पायाभूत सुविधांच्या बांधकामात भारताने एक समग्र दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.

पहिली वंदे भारत एक्सप्रेस फेब्रुवारी २०१९ मध्ये दिल्ली आणि वाराणसी दरम्यान चालवण्यात आली. यानंतर, ऑक्टोबर २०१९ मध्ये ही ट्रेन नवी दिल्ली आणि कटरा दरम्यान चालवण्यात आली. नवीन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या प्रक्लपाला प्राधान्य दिलं आहे. रेल्वे मंत्रालयाने पुढील वर्षी म्हणजेच ऑगस्ट २०२२ पर्यंत १० नवीन गाड्यांद्वारे १० शहरांना जोडण्याची योजना आखली आहे.

नवीन गाड्यांमध्ये सीट रिकलाइनिंग, विषाणुमुक्त वातानुकूलन यंत्रणा, चार आपत्कालीन खिडक्या, प्रत्येक डब्यात दोन ऐवजी चार आपत्कालीन पुश बटणे अशी अतिरिक्त वैशिष्ट्ये अपेक्षित आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75 vande bharat trains india in 75 weeks of amrit mahotsav of independence says pm modi abn
First published on: 15-08-2021 at 09:40 IST