पणजी : ‘भारत जोडो’ यात्रेद्वारे पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला गोव्यात बुधवारी मोठा धक्का बसला. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसच्या ११ पैकी आठ आमदारांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  

गोवा विधानसभेसाठी मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ११ उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी बहुतांश आमदार पक्षांतर करणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. अखेर काँग्रेसचे आठ आमदार बुधवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले. दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलेला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प अमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नाडिस अशी या आमदारांची नावे आहेत.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बुधवारच्या बैठकीत भाजपमध्ये विलीन होण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, असे मायकेल लोबो यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आम्ही आमदारांनी हा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया लोबो यांनी दिली. मात्र, विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारांशी व पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेल्या या आमदारांचे हे कृत्य म्हणजे विश्वासघाताचा कळस असल्याची टीका काँग्रेसने केली.

एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतल्याची आठवण करून देताच दिगंबर कामत म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी मी पुन्हा मंदिरात गेलो होतो. तिथे देवाला ‘मी काय करू?’ असे विचारले तेव्हा देवाने मला सांगितले, की जे तुझ्यासाठी हितकारक आहे ते कर!

गोव्यातील विधानसभा निवडणुकीआधी त्यावेळी उमेदवार असलेल्या या आमदारांनी जानेवारीमध्ये मंदिर, चर्च आणि दग्र्यात जाऊन एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. जुलै २०१९ मध्येही अशाच प्रकारे गोव्यातील काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेसमध्येच राहण्याचा तीन आमदारांचा निर्धार

या पक्षांतरामुळे काँग्रेसकडे केवळ तीन आमदार उरले आहेत. युरी आलेमाव, अल्टोन डिकोस्टा आणि कार्लोस अल्वारेस फरेरा या काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षातच राहण्याचा निर्धार केला आहे. गोव्यात ४० सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे संख्याबळ २८ वर पोहोचले आहे.

या आमदारांनी भाजपमध्ये बिनशर्त प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे गोव्यातून ‘काँग्रेस छोडो’ यात्रा सुरू झाली आहे.

प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

भाजपला जोडणे नव्हे, फक्त तोडणे जमते, हे पुन्हा सिद्ध झाले. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजपने ‘ऑपरेशन किचड’ राबवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवन खेरा, प्रसिद्धिमाध्यम प्रमुख, काँग्रेस