Infosys चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी आठवड्याला ७० तास काम करणं अनिवार्य असल्याचं मत व्यक्त केलं होतं. यामुळे त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. कर्मचाऱ्यांबद्दल असंवेदनशीलतेचाही आरोप त्यांच्यावर झाला. त्यानंतरही यासंदर्भात काही उद्योग प्रमुखांनी समर्थन वा विरोधात मतं व्यक्त केली. आता एका भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यावसायिक महिलेने केलेलं विधान चर्चेत आलं आहे. आठवड्याला ८० तास काम करणं काही फार होत नाही, असा मुद्दा सदर महिला व्यावसायिकेने मांडला आहे.

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्या नेहा सुरेश यांनी यासंदर्भात एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आपली भूमिका मांडली आहे. त्यासोबत त्यांनी फास्ट फॉरवर्डमध्ये चालणारा एक मिनिटाचा व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती एका खिडकीच्या समोर बसून सलग काम करताना दिसत आहेत. या व्हिडीओसोबत केलेल्या पोस्टमध्ये नेहा सुरेश यांनी काम करण्याच्या तासांबद्दलचा दावा केला आहे.

“स्वप्नं पूर्ण करायची असतील, तर दिवसाला १४ तास काम”

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसाला १४ तास काम करावं लागेल, असा दावा नेहा सुरेश करतात. “जर तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसाला १४ हून अधिक तास काम करत नसाल, तर तुमची स्वप्नं कधीच पूर्ण होणार नाहीत. फक्त ९ ते ५ या काळात कार्यरत राहणाऱ्या उत्साह व उर्जेच्या मदतीने तुम्ही जग बदलणारं काहीही घडवू शकणार नाही. आठवड्याला ८० तास काम करणं काही फार मोठी बाब नाही. कामाच्या वेळेचा तो किमान निकष आहे”, असं या पोस्टमध्ये नेहा सुरेश यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

नेहा सुरेश यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार ही पोस्ट ३१ जुलै रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास शेअर केली होती. सदर वृत्त प्रकाशित करेपर्यंत ही पोस्ट व त्यासोबतचा व्हिडीओ ७३ हजारहून अधिक नेटिझन्सनी पाहिला आहे. या पोस्टवर येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये काही समर्थन करणाऱ्या तर काही विरोध करणाऱ्या आहेत. त्यातल्या काही प्रतिक्रियांमध्ये व्हिडीओत दिसणाऱ्या नेहा सुरेश यांना नवीन खुर्ची घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यावर लागलीच नेहा सुरेश यांनी १ ऑगस्ट रोजी नवीन खुर्ची घेतल्याचा फोटो पोस्ट करून त्यासंदर्भातली माहिती शेअर केली.

१४ कशाला? २४ तास काम करू की – नेटिझन्सचा संताप

दरम्यान, काही नेटिझन्सनी नेहा सुरेश यांच्या या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “फक्त १४ तास का? २४ तास काम करायला लावा”, असा सल्ला एका युजरनं दिला आहे. “व्वा.. आणखी एक अशी व्यक्ती जिला स्वत:चं सोशल लाईफ नाही किंवा कुठली बिलं चुकवावी लागली नाही ती मला सांगतेय की मी माझं आयुष्य उत्तमप्रकारे कसं जगायला हवं”, अशी टिप्पणी दुसऱ्या एका युजरनं केली आहे.

काहींचं समर्थन, म्हणाले हे आवश्यकच!

काही युजर्स नेहा सुरेश यांच्या भूमिकेचं समर्थन करतानाही दिसत आहेत. “८० ते १०० तास हे खूप जास्त आहे. पण दर तुम्हाला साम्राज्य उभं करायचं असेल, तर ‘खूप जास्त’चीच आवश्यकता असते”, अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. NativeStack AI चे संस्थापक म्हणाले, “हे भरघोस असं प्रोत्साहन आहे. काहींसाठी काम आणि आराम यातील समतोल महत्त्वाचा असतो. पण काहींसाठी काहीतरी अतुलनीय करून दाखवण्यासाठी सर्वस्व झोकून देणे, तासनतास त्यासाठी प्रयत्न करत राहणे हेच सत्य असतं”.