Crime News : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आल्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. यादरम्यान गुजरातच्या अहमदाबाद येथे १७ मार्च रोजी डायरेक्टर्स ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) ने केलेल्या छापेमारीत ८८ किलो सोन्याचे बार आणि १९.६६ किलो सोन्याचे दागिने सापडले आहेत. गुजराच्या दहशतवाद विरोधी पथकाबरोबर मिळून डीआरआय अधिकाऱ्यांनी पालडी भागातील एका फ्लॅटवर छापेमारी केली होती, ज्यामध्ये हे घबाड आढळून आले आहे.

नेमकं काय सापडलं?

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, “शोध मोहिमेत ८७.९२ किलोग्रॅम सोन्याचे बार जप्त करण्यात आले आहेत, ज्यांची किंमत सुमारे ८० कोटी रुपये आहे. यातील बहुतांश सोन्याच्या बारवरती परदेशी खुणा आहेत, ज्यावरून दिसून येते की हे बार भारतात तस्करी करून आणले गेले होते.” इतकेच नाही तर १९.६६ किलोग्रॅम वजनाचे दागिने आढळले आहेत जे हिरे आणि काही मौल्यवान रत्नांनी जडवलेले आहेत.

११ लक्झरी घडाळे जप्त

या कारवाईत ११ लक्झरी घडाळे देखील आढळले आहेत, ज्यामध्ये हिरे जडवलेले पाटेक फिलिप्पे वॉच, जॅकब अँड कंपनी टाइमपीस आणि फ्रँक मुलर वॉच यांचा देखील समावेश आहे, अशी माहितीही निवेदनात देण्यात आली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेले दागिने आणि लक्झरी घड्याळे यांचे मुल्यमापन करण्याचे काम सुरू आहे. डीआरआय पथकाला १.३७ कोटींची रोकड देखील या फ्लॅटमधून जप्त करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात रान्या रावचे प्रकरण गाजत असताना हे सोने सापडले आहे. डीआरआय अधिकार्‍यांना ३ मार्च रोजी दुबईहून आलेल्या रान्या रावच्या ताब्यातून बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ किलो सोने सापडले होते, ज्याची किंमत १२.५६ कोटी रुपये आहे. तसेच इंडियन कोस्टल गार्डने ७ मार्च रोजी केलेल्या एका संयुक्त कारवाईत डीआरआयने मालदीवहून येणाऱ्या एका जहाजात ३३ कोटी रुपये किंमतीचे २९.९५४ किलो हशीश तेल जब्त केले होते.