धक्कादायक! नऊ वर्षाच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, अंत्यसंस्कारही केले; दिल्लीत उद्रेक

आरोपींनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली

दिल्लीत एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपींनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. सोबतच पोलिसांना याबद्दल कळवू नका, अन्यथा प्रकरण अजून गुंतागुंतीचं होईल असंही त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. दिल्ली कंटोनमेंट परिसरातील नांगल गावात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रविवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास स्मशानभूमीत असणाऱ्या कूलरमधून थंड पाणी आणण्यासाठी घऱाबाहेर पडली होती. पण घऱातून बाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. जवळपास सहाच्या सुमारास स्मशानमभूमीतील पुजारी आणि पीडितेच्या आईच्या ओळखीतल्या काही जणांनी फोन करुन त्यांना बोलावलं आणि मृतदेह दाखवला. वॉटर कूलरमधून पाणी पित असताना विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला असं त्यांनी पीडितेच्या आईला सांगितलं.

पीडितेच्या हातावर जखमा होत्या तसंच तिचे ओठ निळे पडले होते असंही पोलिसांनी सांगितलं आहे. यानंतर त्या पुजारी आणि इतर आरोपींनी मुलीच्या आईला पोलिसांना फोन करु नका, नाहीतर यामुळे गुन्हा दाखल होईल आणि पोस्टमॉर्टम करत तिच्या अवयवांची चोरी होईल असं सांगत घाबरवलं. यानंतर महिलेची संमती नसतानाही पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेने तात्काळ आपल्या पतीला फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर जवळपास २०० लोक स्मशानभूमीजवळ जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना कळवलं.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पुजाऱ्याला अटक केली आहे. क्राइम ब्रांच आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरुन पुरावे जमा केले असून याप्रकरणी तपास सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 9 year old raped murdered forcibly cremated in delhi sgy