राज्यातील प्रमुख अभयारण्यांच्या हद्दीत येणाऱ्या ९४ गावांचे स्थलांतर मध्य प्रदेश सरकारने केले आहे. कान्हा, पेंच, बांधवगड, सातपुडा, पेन्ना यांसह मध्य प्रदेशात एकूण १० राष्ट्रीय उद्याने, तर २५ अभयारण्ये आहेत.
अभयारण्यांच्या परिसरातील लोकांना सुरक्षेच्या दृष्टीने अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. कधी पाळीव प्राण्यांची जनावरांकडून हत्या व्हायची, तर कधी माणसांवरच श्वापदांचा हल्ला होत असे. त्याशिवाय वन्य संरक्षण कायद्यानुसार जमिनींच्या खरेदीविक्रीस मनाई असल्याने तसेच या भागात घरे बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असल्याने लोकांना आयुष्य कंठणे कठीण होऊ लागले होते.
या दृष्टीने सरकारने ८२१ गावांना स्थलांतरित होण्याची अधिसूचना जारी केली होती. त्यापैकी ४२६ गावे नव्या सीमारेषा ठरविण्यात आल्यानंतर स्थलांतरित केली जाणार आहेत; तर १९२ गावांचे ‘एन्क्लेव्ह’ म्हणून जतन करण्यात येणार आहेत. उर्वरित ११२ गावांचे मात्र स्थलांतर करावे लागणार होते. त्यापैकी ९४ गावांचे स्थलांतर सरकारकडून करण्यात आले.