Hyderabad Crime : देशभरात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना कमी होण्यासाठी सातत्याने पावलं उचलले जातात. मात्र, तरीही गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. दररोज अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. आता हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. १० वर्षांच्या मुलीची तब्बल १८ वेळा वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
नेमकं काय घडलं?
एका १० वर्षांच्या मुलीची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शुक्रवारी १४ वर्षांच्या एका दहावीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेला आरोपी हा अल्पवयीन असून त्याचं कुटुंब हे पीडित मुलीच्या शेजारी राहत होतं. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मुलगा पैसे चोरण्याच्या उद्देशाने मुलीच्या फ्लॅटमध्ये चाकू घेऊन घुसला.
त्याला माहित होतं की तिचे पालक कामावर गेलेले असतील. तसेच त्या मुलीला सुट्टी असल्याने ती घरी एकटीच होती. जेव्हा तो आरोपी घरात चोरी करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तिने त्याला पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. मात्र, याचवेळी आरोपीने तिच्यावर किमान १८ वेळा चाकूने वार केले आणि गळा चिरला असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
पोलिसांनी आरोपी मुलाच्या मोबाईलचा ब्राउझिंग इतिहास तपासला असता त्यामध्ये असं आढळून आलं की, तो कुलूप कसं तोडायचं? घरात कसं घुसायचं? पळून कसं जायचं? तिजोरी कशी फोडायची? अशी माहिती त्याने सर्च केली होती. तसेच मुलीची कथित हत्या केल्यानंतर हा मुलगा शेजारच्या दुसऱ्या इमारतीत पळून जाऊन लपून बसला होता. पोलिसांना आरोपीच्या घरातून रक्ताने माखलेला चाकू आणि कपडे आढळून आले. तसेच एक कागद देखील सापडला. ज्यावर कुलूप कसं तोडायचं याविषयी काही अक्षरे लिहिलेले होते. तसेच शेवटी पेन्सिलने ‘मिशन डॉन’ असं लिहिलेलं होतं.