पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. या मोहिमेविरोधात पाकिस्ताननेही भारताच्या सीमेवरील गावांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. पण हे हल्ले भारतीय सैन्यांनी तत्काळ परतवून लावले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. भारतीय सैन्यांनी हे हल्ले कसे परतवून लावले? पाकिस्तानच्या कारवाईवर देखरेख कशी ठेवली? याबाबत राजपूत रेजिमेंटच्या जवानांनी सखोल माहिती दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृ्त्त दिलं आहे.

ऑपरेशन सिंदूर सुरू होताच काही वेळातच आम्ही पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या, असं पाकिस्तानी हाणून पाडणारे राजपूत रेजिमेंटचे आर्मी मेजर आणि त्यांच्या टीमने सांगितलं. “ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून १० मे रोजी पाकिस्तानने भारतीय भागांना लक्ष्य केले तेव्हा माझ्या कमांडिंग ऑफिसरने मला सोपवलेले काम म्हणजे जम्मू सेक्टरमधील नागरी क्षेत्रांवर आणि भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार करणाऱ्या चौथ्या शत्रू चौकीला निष्क्रिय करणे”, असे मेजर म्हणाले.

“शत्रूच्या चार चौक्यांपैकी दोन हायब्रिड चौक्या होत्या ज्या आमच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी लाँच पॅड म्हणून काम करत होत्या”, असे त्यांनी पुढे सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय सैन्याकडे या शत्रू चौक्यांबद्दल आधीच गुप्त आणि तपशीलवार माहिती होती.

रॉकेट लाँचर, मोर्टार, प्रगत एके-सिरीज रायफल्स, हलक्या मशीन गन, ग्रेनेड लाँचर आणि मानक पायदळ शस्त्रे यासारख्या शस्त्रास्त्रांचा वापर करून भारतीय सैन्याने दृढ प्रति-हल्ला चढवला. बजरंग बली की जय म्हणत आम्ही जवळपास १८ ते ३२० शत्रूंचा खात्मा केला, असंही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं इंडिया टुडेच्या वृत्तात आहे.

सैनिकांच्या मते, भारतीय सैन्याला या क्षेत्रात तांत्रिकदृष्ट्याही फायदा होता, ज्यामुळे त्यांना पाकिस्तानी प्रक्षेपणास्त्रे आणि चौक्यांचा यशस्वीपणे मागोवा घेणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे आणि त्यांना नष्ट करणे शक्य झाले. “आम्ही चौकीवरील लक्ष्यावर सतत लक्ष ठेवून होतो, बॉम्ब कुठे पडत आहेत आणि कुठे पडत नाहीत याचा मागोवा घेत होतो. देखरेखीच्या माहितीच्या आधारे, आम्ही त्यानुसार प्रतिसाद दिला”, असे दुसऱ्या सैनिकाने सांगितले.