दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बुधवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत एका भाजपा समर्थकाने अचानकपणे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्याने एकच गोंधळ उडाला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या अजयसिंह बिष्ट या मूळ नावाने संबोधल्याने भाजपा समर्थकाने हा आक्षेप घेतला. यावेळी त्याने हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी रायबरेलीत काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्या गाडीवर झालेल्या कथित हल्ल्याच्या मुद्यावर पत्रकार परिषद बोलावली होती. यादरम्यान त्यांनी योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या अजयसिंह बिष्ट या मुळ नावाने संबोधले. हे ऐकूण या ठिकाणी उपस्थित असलेल्या नचिकेता वाल्हेकर या व्यक्तीने माध्यम प्रतिनिधींसमोर येत आक्षेप घेतला. आदित्यनाथ यांना अजय सिंह बिष्ट असे संबोधने म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, असे म्हणत त्याने हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित सर्वजणच काही क्षणासाठी गोंधळले. पत्रकार परिषदही काही मिनिटांसाठी थांबली होती. यानंतर लगेचच त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरून बाहेर काढले व नंतर पोलिस त्याला घेऊन गेले.

दरम्यान या व्यक्तीने माध्यमांना बोलताना सांगितले की, ‘माझी मागणी ही आहे की ज्यांचे आई-वडील किंवा पत्नी परदेशी आहेत. त्यांना या देशात निवडणुक लढवू दिली नाही पाहिजे, कारण हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. असे करणे म्हणजे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण करण्यासारखे आहे. यांची ममता बॅनर्जींचे नाव घेण्याची हिम्मत होत नाही, हे लोक केवळ मोदी-शाहच करत आहेत, मोदी-शाह यांनी देशासाठी खुप केले आहे’. या गोंधळानंतर पवन खेडा यांनी याप्रकरणी कुठलेही भाष्य केले नाही. या व्यक्तीने तो महाराष्ट्रातील अहमदनगरचा असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man interrupts the media briefing by congress spokesperson
First published on: 15-05-2019 at 19:16 IST