पीटीआय, नवी दिल्ली : संसदेच्या नव्या इमारतीमध्ये महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्याने देशाच्या नव्या भवितव्याचे संकेत मिळत आहेत. मुलींसाठी प्रगतीची नवी दारे उघडण्याचे आमच्या सरकारचे धोरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. सरकारच्या विविध विभागांत निवड झालेल्या ५१ हजार नव्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रम मोदी यांच्या उपस्थितीत आभासी पद्धतीने झाला. त्यानंतर झालेल्या रोजगार मेळाव्यात मोदी बोलत होते. त्यांनी सरकारी कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही या वेळी केले. यातून कामाचा वेग वाढण्याबरोबरच भ्रष्टाचार, गैरप्रकारांना आळा बसतो. कर्मचाऱ्यांनी काम करताना नागरिक प्रथम हे तत्व पाळावे.

नऊ लाख जणांना सरकारी नोकरी

२०१४ पासून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या वेगवेगळय़ा विभागांत नऊ लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. तुलनेत, काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने पहिल्या नऊ वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची भरती केली होती, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी रोजगार मेळाव्यात दिली.

३० दिवसांत भारताच्या मुत्सद्देगिरीने नवीन उंची गाठली – मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले की, गेल्या ३० दिवसांत भारताच्या मुत्सद्देगिरीने नवीन उंची गाठली आहे. जी-२० शिखर परिषदेदरम्यान घेतलेल्या काही निर्णयांमुळे २१ व्या शतकातील जगाची दिशा बदलण्याची क्षमता आहे. जी-२० युनिव्हर्सिटी कनेक्टच्या अंतिम फेरीत विद्यार्थी, प्राध्यापक आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, ३० दिवसांत त्यांनी ८५ जागतिक नेत्यांची भेट घेतली. आजच्या ध्रुवीकृत आंतरराष्ट्रीय वातावरणात, अनेक देशांना एका व्यासपीठावर एकत्र करणे ही छोटी गोष्ट नाही. देशाच्या विकासाचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी स्वच्छ, स्पष्ट आणि स्थिर प्रशासन आवश्यक आहे. मला तुम्हाला गेल्या ३० दिवसांचे रिपोर्ट कार्ड द्यायचे आहे. त्यावरून तुम्हाला नवीन भारताचा वेग आणि दर्जा याची कल्पना येईल, असे मोदी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या भारताचे स्वप्न भव्य आहे. अवकाश ते क्रीडा अशा सर्व क्षेत्रांत मुली आहेत. सैन्यदलातही मुलींना स्थान मिळाले आहे. कोणत्याही क्षेत्रात महिला गेल्यास त्या क्षेत्रात सकारात्मक बदल होतात. येत्या काही वर्षांत भारत ही जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. या प्रक्रियेत सरकारी कर्मचाऱ्यांनी योगदान देण्याला मोठी संधी आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान