scorecardresearch

“…आणि मला समजलं माझ्या बाबांचा मृत्यू झाला”, राहुल गांधींनी सांगितली मनातली वेदना

आपल्या मनात असलेली एक वेदना राहुल गांधी यांनी यावेळी बोलून दाखवली, तसंच काश्मीरच्या लोकांना काय वाटत असेल ते मी समजू शकतो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Know What Rahul Gandhi Said
जाणून घ्या राजीव गांधींबाबत काय म्हणाले राहुल गांधी?

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मृत्यू मानवी बॉम्बस्फोटात झाला. अवघा देश त्या घटनेमुळे हळहळला होता. २१ मे १९११ हाच तो दिवस होता ज्यादिवशी एक महिला राजीव गांधी यांना पाया पडण्यासाठी खाली वाकली त्यावेळी तिच्या शरीरावर लावण्यात आलेलं RDX चा स्फोट झाला आणि त्या स्फोटात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम अर्थात लिट्टे होतं. या घटनेने सगळ्या देशाला हादरवून टाकलं होतं. राजीव गांधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा राहुल गांधी अवघे २१ वर्षांचे होते. आपल्याला त्यावेळी ही बातमी कशी समजली? ही वेदना आज राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या भाषणात बोलून दाखवली.

राहुल गांधी यांनी बोलून दाखवली वेदना

मी आत्तापर्यंत हिंसा पाहिली आहे. अनुभव घेतला आहे. त्यामुळेच मोबाइलकडे किंवा फोनकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन वेगळा आहे. हा आमच्यासाठी फक्त टेलिफोन नाही. माझ्या आजीची हत्या करण्यात आली त्यानंतर सहा-सात वर्षांनी आणखी एक घटना घडली. २१ मे चा दिवस होता. पुलवामामध्ये आपले सैनिक मारले गेले तिथे फोन आला असेल. काश्मिरींच्या घरी फोन आले असतील. त्यावेळी मला फोन आला तो माझ्या बाबांच्या(राजीव गांधी ) मित्राचा होता. त्यांनी मला फोनवर सांगितलं राहुल वाईट बातमी आहे. मी त्यांना म्हटलं हो मला समजलं आहे की बाबा (राजीव गांधी) यांचा मृत्यू झाला आहे. त्यावर ते हो म्हणाले मी त्यांना थँक्स म्हटलं आणि फोन ठेवला. राहुल गांधी यांनी आपल्या मनात ठसठसत असलेली ही वेदना बोलून दाखवली. तसंच ज्याने हिंसा पाहिली आहे, अनुभवली आहे त्यालाच हिंसा कळते असंही ते म्हणाले.

मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका

जो हिंसाचार घडवतो जसं मोदी आहेत, अमित शाह आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे किंवा अजित डोवल असतील ते या वेदना काय असतात? हे समजू शकणार नाहीत. पुलवामाच्या शहीद सैनिकांच्या मुलांच्या मनात काय वेदना झाल्या असतील तेव्हा काय वाटलं असेल ते मी समजू शकतो माझी बहिण समजू शकते. तो फोन आला तेव्हा मला काय वाटलं असेल हे इथे काश्मीरमधले लोक समजू शकतात. कारण त्यांच्याही घरांमध्ये असे फोन आले असतील.

मला एका पत्रकाराने विचारलं भारत जोडो यात्रेने काय साधलं? काश्मीरमध्ये येऊन काय साध्य केलं. मी त्याचं उत्तर दिलं नाही. मी आज हे उत्तर देतो आहे की आपल्या माणसाचा मृत्यू झाला आहे हे सांगणारे फोन कुठल्याही मुलाला, आईला, वडिलांना, भावाला ऐकावे लागू नयेत हे आमचं लक्ष्य आहे. भाजपा आणि संघाचे लोक मला शिव्या देतात. पण मी त्यांचे आभार मानतो. कारण मला ते जेवढ्या शिव्या देतील त्यातून मी शिकत जातो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:07 IST