Mystery Illness in Jammu : जम्मू काश्मीरमधील बद्दल हे गाव एका वेगळ्याच भीतीच्या छायेत आहे. कारण, या गावातील माणसं दिवसागणिक मृत होत आहेत. ७ डिसेंबरपासून आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला असून या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्याकरता केंद्र सरकारने आंतर मंत्रालयीन समिती तयार केली आहे. तर देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थांतील तज्ज्ञही या मृत्यूमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

यास्मीन कौसर (१५) या चिमुकल्या मुलीचा आता नुकताच मृत्यू झालाय. तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याकरता तिचे वडील मुश्ताक अहमद (३५) आणि आजोबा जमाल दिन (६५) कबर खोदण्यासाठी मदतीची वाट पाहत आहेत. या कामासाठी १०-१२ जण आवश्यक आहेत. मात्र, गावात पसरलेल्या रहस्यमय आजारामुळे गावातील लोक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. करोनोपेक्षाही भयंकर अवस्था या गावात झाली आहे.

“हे माझे आजोबा आहेत. पण आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन ना पाणी पित आणि नाही जेवू शकत आहोत”, अशी तेथील सद्यस्थिती मुश्ताक यांनी सांगितली. मुश्ताक यांनी त्यांच्या मावशी, मामा आणि त्यांच्या घरातील पाच मुलांना आतापर्यंत या आजारामुळे गमावलं आहे.

गावात करोनोपेक्षाही वाईट स्थिती

एका महसूल अधिकाऱ्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “मृत्यू कशामुळे झाला हे शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. त्यामुळे या काळात प्रशासनाने ग्रामस्थांना सध्या कोणतेही सामुदायिक मेळावे आयोजित न करण्याचे आदेश दिले आहेत.” तसंच, या गावातील ठरलेली लग्न सोहळेही पुढे ढकलण्यात आल्याचं येथील गावकऱ्यांनी सांगितलं.

अमित शाहांनी तयार केलेल्या पथकाने घेतली मृतांच्या नातेवाईकांची भेट

सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या पथकाने राजौरी जिल्हा मुख्यालयापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाला भेट दिली आणि मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अधिकाऱ्यांनी तेथील विहिर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या विहिरीत किटकनाके असण्याची शक्यता हे. हेच पाणी येथे वापरले गेल्याचा संशय आहे.

वैद्यकीय संस्थांतील तज्ज्ञ लागले कामाला

दरम्यान, देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थांतील तज्ज्ञ चंदीगडचे PGIMER, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने गावाला भेट दिली. या संस्थांनी येथील पाणी आणि अन्नाचे नमुने तपासले आहेत. जम्मू आणि काश्मीर सरकारला दिलेल्या त्यांच्या अहवालात, तज्ञांनी सांगितले होते की मृत्यू झालेल्यांच्या नमुन्यांमध्ये काही न्यूरोटॉक्सिन आढळले आहेत. “हे मृत्यू स्थानिकीकृत असल्याचे आढळून आले आणि संभाव्यत: काही महामारीविषयक संबंध आहेत”, असे अधिकृत प्रवक्त्याने गेल्या आठवड्यात सांगितले होते.

सुरुवात नेमकी कुठून झाली?

गावकऱ्यांनी सांगितले की २ डिसेंबर रोजी गावकरी फझल हुसैन यांची मुलगी सुलताना हिच्या लग्नासाठी सर्व जमले होते. तेव्हापासून सगळे आता कोणाच्या तरी अंत्यविधीसाठी जमत आहेत. या रहस्यमय घटनेत फझल हुसैन, मोहम्मद अस्लम आणि मोहम्मद रफिक या तीन कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.

सुलतानाचं लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी फजल आणि त्याची चार मुले आजारी पडली. त्यांना कोटरंका येथील शासकीय वैद्यकीय सुविधेत आणि नंतर राजौरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना ७ डिसेंबरला जम्मूला जाण्यास सांगितले. परंतु, फजलचा वाटेतच मृत्यू झाला तर दुसऱ्या दिवशी त्याच्या मुलांचा मृत्यू झाला. मोहम्मद रफिकच्या कुटुंबातील चार सदस्य, त्यांची गर्भवती पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी अशाच लक्षणांसह हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना सुरुवातील सौम्य ताप येऊन ते बेशुद्ध पडले. उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. गावकऱ्यांनी सांगितले की, रफिक आणि फजल हे एकमेकांचे नातेवाईक असून सुलतानाच्या लग्नात या दोघांचेही कुटुंब हजर होतं. त्यामुळे सुरुवातीला डॉक्टरांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खातमानंतरही अनेकांचा मृत्यू

पण एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही त्याच गावातील आणखी लोकांना तत्सम लक्षणांसह रुग्णालयात आणण्यात आले आणि त्यांचाही अशाच परिस्थितीत मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूमागचे रहस्य अधिक गडद होत गेलं. त्यावेळी काही गावकऱ्यांनी सांगितलं की, फजलच्या घरी मृत्यू झाल्यानंतर ४० दिवसांनी त्यांच्या घरी खातम (शोक समाप्त करण्यासाठी) झाली होती. तेथेही काही उपस्थित ग्रामस्थांनी भोजन केलं होतं. त्या भोजनात गावकऱ्यांना पॅकेटमध्ये गोड भात मोहम्मद युसूफ आणि मोहम्मद अस्लम यांच्या घरी पाठवण्यात आला होता. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांच्या अस्लमच्या कुटुंबातील सहा मुलांचा याच आजाराने मृत्यू झाला. ज्या जागेवर लहान मुलं खेळत होती, त्याच जागेव त्या मुलांना आता पुरण्यात आलंय, अशी खंतही जमाल दिन यांनी व्यक्त केली.