बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूरला पोहोचले असताना एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला. तरुण नितीशकुमार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, नितीशकुमार यांच्या अंगरक्षकांनी वेळीच त्याला रोखल्याने, नितीश कुमार यांना काही झाले नाही.

यानंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या त्या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा व्हिडिओही देखील समोर आला आहे. ज्यामध्ये तो तरुण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागोमाग मंचावर चढतो आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला चढवताना दिसत आहे. मात्र सुदैवाने त्याच क्षणी नितीश कुमार यांचे अंगरक्षक त्या तरूणावर तुटून पडतात व त्याला आपल्या ताब्यात घेत, मंचावरून खाली खेचून आणताना दिसतात.