दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष असताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने गुरुवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरूण जेटली यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशीही मागणी आपच्या नेत्यांनी केली.
दिल्लीच्या सचिवालयातील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयने दोन दिवसांपूर्वी छापा टाकला. हा छापा प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर टाकण्यात आला होता, असे सीबीआयने म्हटले होते. मात्र, त्यानंतर आपने थेट अरूण जेटली यांच्यावरच निशाणा साधला. दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जेटलींवर गंभीर आरोप केले. दिल्लीमध्ये क्रिकेटचे मैदान तयार करण्यासाठी डीडीसीएने २४ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. पण प्रत्यक्षात ११४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जेटली हे ‘एलिट क्लब’प्रमाणे डीडीसीएचा कारभार चालवत होते, असे आरोप करण्यात आले आहेत.
अरूण जेटली जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात कायम आहेत. तोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी आपचे नेते संजय सिंग यांनी केली आहे.
दरम्यान, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून ते निराधार असल्याचे म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2015 रोजी प्रकाशित
‘आप’कडून जेटलींवर भ्रष्टाचाराचे आरोप, मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी
रविशंकर प्रसाद यांनी आपने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Written by विश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 17-12-2015 at 15:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap asks pm modi to sack arun jaitley over alleged corruption in delhi cricket board