पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबतच भाजपाला देखील यश मिळवता आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं जोरदार मुसंडी मारत पंजाबमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे भाजपा आणि आपमध्ये जोरदार सुंदोपसुंदी सुरू झाली असताना आता आपकडून अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर भाजपाकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अरविंद केजरीवाल यांच्या हत्येच्या कटाचा गंभीर आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हा पूर्वनियोजित कट”

अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर झालेला प्रकार हा पूर्वनियोजित कटच होता, असा दावा मनीष सिसोदिया यांनी केला आहे. “पोलिसांच्या उपस्थितीत भाजपाचे गुंड अरविंद केजरीवाल यांच्या घरी नेण्यात आले. त्यांच्या घरचे सीसीटीव्ही फोडले गेले. त्यांचे बूम बॅरिअर तोडण्यात आले. हे सगळं भाजपाच्या गुंडांनी पोलिसांच्या उपस्थितीत केलं”, असं ते म्हणाले.

“हा पूर्वनियोजित कट रचून अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला. केजरीवाल यांना निवडणुकीत हरवू शकले नाही म्हणून आता त्यांची हत्या करून त्यांना संपवण्याचा भाजपाचा डाव आहे”, असा आरोप सिसोदिया यांनी भाजपावर केला आहे.

“मी भाजपाला म्हणतो की अरविंद केजरीवाल यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रकारे हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा कट देश सहन करणार नाही”, असं देखील सिसोदिया म्हणाले.

पराभवानंतर भाजपा सैरभैर

दरम्यान पंजाबमधल्या पराभवानंतर भाजपानं हत्येचा कट रचल्याचं सिसोदिया म्हणाले आहेत. “भाजपानं हा जीवघेणा हल्ला केला आहे. पंजाबमध्ये पराभूत झाल्यामुळे भाजपा सैरभैर झाली आहे. केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करू शकले नाहीत, म्हणून त्यांची हत्या करण्याचा कट भाजपानं रचला. हे फार गंभीर आहे”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap manish sisodia claims arvind kejriwal murder conspiracy by bjp pmw
First published on: 30-03-2022 at 17:02 IST