मोदी सरकारने तुरुंगांच्या व्यवस्थापनासाठी देण्यात येणाऱ्या निधीत तरी वाढ करावी, कारण येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांनाही तुरुगांत जावं लागेल, अशी खोचक टीका आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. राज्यसभेत अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.
नेमंक काय म्हणाले संजय सिंह?
“यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने शिक्षण, संरक्षण, कृषी, आरोग्य अशा महत्त्वाच्या क्षेत्राचा निधी कमी केला आहे. इतकच नाही तर, मोदी सरकारने या अर्थसंकल्पात तुरुंगांच्या व्यवस्थापनासाठी देण्यात येणाऱ्या निधीतही घट केली आहे. मोदी सरकारने किमान या निधीत तरी वाढ करावी, कारण आगामी काळात विरोधकांनाही तुरुंगात जायचं आहे”, अशी खोचच टीका संजय सिंह यांनी केली.
“स्वत:ची खूर्ची वाचवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न”
“निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला भाजपाचे लोक क्रांतिकारी म्हणत आहेत. हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे, असं सांगितलं जात आहे. मात्र, वास्तविकता ही आहे, की मोदी सरकारने या अर्थसंकल्पात शिक्षण, संरक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रासाठीच्या निधीत घट केली आहे, मुळात मोदी सरकारने केवळ स्वत:ची खूर्ची वाचवण्यासाठी दोन राज्यांना भरघोस मदत दिला आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
“विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ईडी-सीबीआय वापर”
पुढे बोलताना संजय सिंह यांनी मोदी सरकार विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर करत असल्याचाही आरोप केला. “मोदी सरकारने खोट्या आरोपाखाली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिक्षमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या तीन मंत्र्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांवरही अशाप्रकारे कारवाई करण्यात आली आहे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Kanwar Yatra Update: “नाव सांगण्याचा कुणावर दबाव टाकता येणार नाही”, सुप्रीम कोर्टानं यूपी सरकारला सुनावलं!
संजय सिंह यांच्या टीकेवर राज्यसभेचे सभापती म्हणाले…
दरम्यान, संजय सिंह यांनी तुरूंगाच्या निधीबाबात केलेल्या टीकेवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनीही भाष्य केलं. “संजय सिंह यांनी अतिशय महत्त्वाच्या आणि मार्मिक विषयांवर टीप्पणी केली आहे. याला एक विशेष पार्श्वभूमीसुद्धा आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांनी याची दखल घ्यावी”, असे ते म्हणाले. यावर बोलताना भाजपाचे नेते जे.पी. नड्डा यांनी संजय सिंह यांच्या सुचनेची दखल घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.