Serial Killer Devendra Sharma Arrested : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज एक मोठी कारवाई करत कुप्रसिद्ध गुन्हेगार असलेल्या एका सिरीयल किलरला अटक केलं आहे. देवेंद्र शर्मा असं आरोपीचं नाव असून त्याला’डॉक्टर डेथ’ म्हणून सर्वत्र ओळखलं जातं होतं. आरोपी देवेंद्र शर्मा हा आयुर्वेदिक डॉक्टर असून त्याचा किडनीच्या रॅकेटमध्ये आणि अनेक खूनाच्या गुन्ह्यांत सहभाग होता. आरोपी देवेंद्र शर्माला रविवारी दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधील दौसा येथून अटक केली आहे.
आरोपी देवेंद्र शर्मा हा राजस्थानमधील दौसामध्ये बनावट नावाने एका आश्रमात पुजारी म्हणून राहत होता. पोलिसांनी मंगळवारी आरोपीच्या अटकेची माहिती दिली आहे. पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी देवेंद्र शर्मा २०२३ मध्ये तुरुंगातून फरार झाला होता. तो आयुर्वेद चिकित्सक होता. पण पुढे तो गुन्हेगार बनला. त्याला अनेक खून प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं.
उत्तर प्रदेशातील कासगंज येथील मगरी असलेल्या एका कालव्यात तो बळींचे मृतदेह टाकत होता अशी माहिती समोर आली होती.६७ वर्षीय देवेंदर शर्माला अनेक खून प्रकरणा दोषी ठरवण्यात आलं होतं. दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामधील ७ वेगवेगळ्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच गुरुग्राम न्यायालयाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षाही सुनावली होती.
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, “बीएएमएस पदवीधारक देवेंदर शर्मा २००२ ते २००४ दरम्यान अनेक टॅक्सी आणि ट्रक चालकांच्या क्रूर हत्येप्रकरणी तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पण २०२३ मध्ये तो तुरुंगातून फरार झाला होता. आरोपी शर्मा आणि त्याचे साथीदार ट्रिपसाठी ड्रायव्हर्सना बोलावायचे आणि त्यांची हत्या करायचे. तसेच ती वाहने विकून पैसे घेऊन फरार व्हायचे. तसेच अनेक मगरी असलेल्या प्रसिद्ध हजारा कालव्यात सर्व पुरावे टाकून मृतदेह फेकून द्यायचे. आरोपी शर्मा हा खून, अपहरण आणि दरोड्याच्या किमान २७ गुन्ह्यात सहभागी होता.
दरम्यान, आरोपीने २००४ मध्ये पहिल्यांदा बेकायदेशीर मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेट चालवलं होतं अशी माहिती समोर आली होती. त्याने अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि मध्यस्थांच्या मदतीने १२५ हून अधिक बेकायदेशीर प्रत्यारोपणांना मदत केल्याची कबुली दिली होती. १९९४ मध्ये आरोपी शर्मा गॅस डीलरशिपमध्ये अयशस्वी झाल्यानंतर मोठे आर्थिक नुकसान सहन न झाल्याने गुन्हेगारीकडे वळल्याचं सांगितलं जातं. आरोपी टॅक्सी भाड्याने घेणे, चालकांची हत्या करणे आणि त्यांची वाहने विकणे आणि मृतदेह मगरींना खायला द्यायचा अशी माहिती सांगितली जाते.