मार्च महिन्यात संरक्षण दलाच्या हरियाणा येथील तळावरून ब्राह्मोस क्षेपणास्त्र थेट पाकिस्तच्या भूमीत गेले होते. या घटनेनंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या घटनेची दखल घेतली होती. दरम्यान, याप्रकरणी भारतीय सरंक्षण दलाने वायुसेनेच्या तीन अधिकाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. तांत्रित बिघाड झाल्यामुळे ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानमधील मिया चन्नू या भागात डागले गेले होते.

हेही वाचा >> ‘अपघाताने क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत’

या कारवाईसंदर्भात भारतीय वायुसेनेने एक निवेदन जारी केले आहे. क्षेपणास्त्र डागण्यासाठीच्या निश्चित कार्यपद्धतीची अंमलबजावणी न केल्यामुळे ही चूक घडली होती, असे या निवेदनात सांगण्यात आले आहे. या चुकीला एकूण तीन अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. हे तिन्ही अधिकारी ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर आणि स्क्वाड्रन लीडरच्या श्रेणीतील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी वायुसेनेने समितीची स्थापना केली होती. अध्यक्षपदी एअर व्हाइस मार्शल आर.के. सिन्हा हे होते. “या घटनेसाठी तीन अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. त्यांची सेवा तत्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आली आहे,” असेदेखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >> प्रेषित मोहम्मद आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण, भाजपा आमदाराला जामीन मंजूर, पक्षाने केली निलंबनाची कारवाई

९ मार्च रोजी नेमकं काय घडलं होतं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्राह्मोस क्षेपणास्त्र थेट पाकिस्तच्या भूमीत डागले गेल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाने निवेदन जारी केले होते. या निवेदनात “९ मार्च २०२२ रोजी नेहमीच्या देखभाल प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मिसाईल अपघाताने प्रक्षेपित झाली. भारत सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या भागात ही मिसाईल डागली गेली आहे. ही दुर्घटना अत्यंत खेदजनक असून या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली ही दिलासादायक बाब आहे,” असे या निवेदनात म्हणण्यात आले होते.