वादग्रस्त अशा फार्म हाऊसमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोघांच्या पोलिस कोठडीत सात दिवसांनी वाढ करण्यात आली. मद्यसम्राट पॉंटी चढ्ढा यांच्या हत्येशी संबंध असल्यच्या संशयावरून हे दोघेही जण पोलिस कोठडीत होते.
विजयकुमार आणि मदन राणा अशी या दोघांची नावे असून ते चढ्ढा यांच्या बिजवासन येथील घराचे केअर टेकर होते आणि घटनेचे गांभीर्य – तसेच सध्या सुरु असलेल्या पोलिसांच्या तपासाच्या गरजा लक्षांत घेता, त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली असल्याचे नगर दंडाधिकारी न्यायमूर्ती रुचिका सिंग यांनी सांगितले.
पोलिसांनी हे दोघेही तपासांत सहकार्य करीत नसल्याचे नमूद केल्याने ही वाढ देण्यात आली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पॉंटी चढ्ढा प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणानंतर केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. बंदूक किंवा एकूणच खासगी शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्याचे सरकारी निकष काय आहेत, तसेच खासगी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या संस्थांचे नियमन कसे केले जाते, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.