Andhra rape-murder : आंध्र प्रदेशमध्ये ७ जुलै रोजी धक्कादायक घटना घडली होती. शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांनी एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी सदर गुन्ह्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आरोपींना पुन्हा घटनास्थळी नेऊन गुन्हा समजून घेतला असताना आरोपींनी गुन्हा करण्याआधी मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचे सांगितले.

आरोपींच्या नातेवाईकांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली

सदर गुन्हा घडल्यानंतर आरोपीचे वडील आणि काकांनी मुलांना वाचविण्यासाठी मुलीचा मृतदेह दुचाकीवरून कृष्णा नदीजवळ नेला. त्यानंतर मृतदेहाला दगड बांधून तो नदीत फेकून दिला, अशी माहिती नांद्याल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अधीराज सिंह राणा यांनी दिली. तीन आरोपींपैकी दोन आरोपी १२ वर्षांचे असून ते सहावीत शिकत आहेत. तर तिसरा आरोपी १३ वर्षांचा असून तो सातवीत शिकत आहे.

हे वाचा >> शाळेतील मित्रांकडूनच आठ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; श्वान पथकाने आरोपींचा ‘असा’ काढला माग

पोलीस अधीक्षक राणा म्हणाले, तीनही आरोपींना आम्ही १० जुलै रोजी बलात्कार आणि खूनाच्या आरोपाखाली अटक केली. पीडित मुलगी ही आठ वर्षांची असून ती इयत्ता तिसरीत शिकत होती. आरोपींनी पीडित मुलीला फसवून निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली.

खून केल्यानंतर आरोपींनी पीडितेचा मृतदेह कालव्यात फेकून आपल्या पालकांना या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर एका आरोपीच्या वडील आणि काकांनी मृतदेह नदीत फेकला. त्यामुळे या प्रकरणी आता वडील आणि काकांनाही गुन्हेगार ठरविण्यात आले आहे.

पोलिसांनी पुढे सांगितले, “मुलीचा मृतदेह मिळेपर्यंत शोधमोहीम सुरू राहणार आहे. “मंगळवारी (दि. १६ जुलै) तीनही आरोपींना न्यायालयात सादर केले होते. ड्रोन आणि पाण्याखाली वापरण्याचा कॅमेरा वापरून पीडितेचा मृतदेह शोधण्यात येत आहे. शोधमोहीमेसाठी एनडीआरफला पाचारण करण्यात आले आहे.”

आंध्रप्रदेशच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या घटनेचा लवकर तपास लागून आरोपींना शिक्षा व्हावी, असा प्रयत्न आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्याबाबत गंभीर मंथन गरजेचे

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनीही या प्रकरणावर उद्विग्न प्रतिक्रिया दिली. सदर गुन्हा अतिशय विकृत असून त्यात आरोपीही अल्पवयीन असल्यामुळे आपल्या समोर शिक्षा देण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असे प्रकार पुन्हा पुन्हा घडत आहेत. त्यामुळे आपल्याला यावर काहीतरी समाधान शोधण्याची गरज आहे. शाळेतील मुख्याध्यापक, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, राष्ट्रीय माध्यमे आणि विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन यावर चर्चा केली पाहीजे, असे त्यांनी सुचविले.