Acid Attack on Delhi University Student : वायव्य दिल्लीत लक्ष्मीबाई महाविद्यालयाजवळ रविवारी (२६ ऑक्टोबर) एक खळबळजनक घटना घडली. दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या बाहेर अ‍ॅसिड हल्ला झाला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती देताना सांगितलं की पीडिता महाविद्यालयात जात असताना तिच्यावर हा हल्ला झाला. पीडितेने तिचा चेहरा वाचवला असला तरी तिचे हात भाजले आहेत. पीडितेच्या तकारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू केली आहे.

ही घटना सकाळी १० वाजता घडली. विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या दिशेने जात असताना एक ज्वलनशील पदार्थ तिच्या अंगावर फेकण्यात आला. विद्यार्थिनीने चेहरा वाचवला असला तरी तिचे हात भाजले. त्यानंतर आसपासच्या लोकांनी जखमी विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात नेलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की तरुणीचे हात भाजले आहेत, त्यावर उपचार करण्यात आले आहेत.

नेमकी घटना काय?

दिल्ली पोलिसांनी या घटनेविषयी निवेदन जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की “मुकुंदनगर येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याचं आम्हाला समजलं. त्यानंतर आम्ही या घटनेप्रकरणी तपास सुरू केला आहे. पीडित तरुणीने सांगितलं की ती द्वितीय वर्षात (नॉन-कॉलेज) शिकत आहे. ती लेक्चरसाठी अशोक विहार येथील लक्ष्मीबाई महाविद्यालयात जात होती. त्याचवेळी तिच्या ओळखीचा इसम जितेंद्र हा तिथे आला. जितेंद्र हा देखील मुकुंदनगर परिसरात राहतो. तो त्याचे साधीदार इशान व अरमान या दोघांना घेऊन तिथे आला होता.

इशानने एक बाटली अरमानकडे दिली. त्या बाटलीत अ‍ॅसिड होतं. अरमानने बाटली तरुणीच्या दिशेने फेकली. पीडित तरुणीने हातांनी बाटली रोखली. त्यामुळे अ‍ॅसिड तिच्या हातावर पडलं. तरुणीचा चेहरा वाचला असला तरी तिचे हात होरपळले आहेत. तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून तिन्ही इसम तिथून पळू गेले.

पीडितेने सांगितलं की जितेंद्र नेहमी तिचा पाठलाग करायचा. महिन्याभरापूर्वी तरुणीने जितेंद्रची कानउघडणी केली होती. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. दिल्ली पोलिसांचं एक पथक व एफएसएलच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. पीडितेची तक्रार, तिला झालेल्या जखमांच्या आधारावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज व विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ उपस्थित लोकांची साक्ष घेऊन पुढील तपास केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.