प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीवर अ‍ॅसिड हल्ल्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (२८ एप्रिल) घडली आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित तरुणी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपाचार केले जात आहे. ती ३५ टक्के भाजली आहे. ही घटना घडल्यानंतर शनिवारी कर्नाटकचे आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी रुग्णालयात जाऊन पीडित तरुणीची भेट घेतली. तसेच त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

यावेळी आरोग्यमंत्री के सुधाकर म्हणाले की, “अ‍ॅसिड हल्ला झालेल्या तरुणीच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करेल आणि हा विकृत प्रकार करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शासन केलं जाईल. राज्य सरकार पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे. तिच्या उपचाराची सर्व काळजी सरकारकडून घेण्यात येईल.”

या घटनेचा निषेध करताना सुधाकर पुढे म्हणाले की, , “हे एक अमानवी कृत्य असून सभ्य समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. अशी प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले पाहिजेत आणि दोषींना त्वरीत कडक शासन व्हायला हवं. तरच आपण विकृत कृत्य करणाऱ्यांना कठोर संदेश देऊ शकतो.”

अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या २७ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव नागेश असून तो बेंगळुरू येथील रहिवासी आहे. अलीकडेच त्याने पीडित तरुणीकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली होती. पण पीडितेनं त्याला नकार दिला. यातूनच त्याने गुरुवारी (२८ एप्रिल) पीडितवर अ‍ॅसिड हल्ला केला आहे. या हल्ल्यात पीडित तरुणी ३५ टक्के भाजली असून बेंगळुरू येथील सेट जॉन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

“पीडित तरुणीच्या उपचारांसाठी आवश्यक असलेली स्किन ग्राफ्ट बीएमसीआरआय (बेंगळुरू मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट) येथील स्किन बँकेतून उपलब्ध करून दिली जाईल. मी स्वतः पीडितेला ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आमचं सरकार पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला उपचारापासून तिच्या पुनर्वसनापर्यंत सर्व प्रकारची मदत करेल,” असं आश्वासनही सुधाकर यांनी यावेळी दिलं.