जगभरातील टीकेवर केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : शहरी नक्षलवादप्रकरणी जामीन याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असतानाच फादर स्टॅन स्वामी यांचे मुंबईत रुग्णालयात निधन झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटले. मात्र, स्वामींविरोधात कायद्यानुसारच कारवाई सुरू होती, असे नमूद करत भारताने या प्रकरणात मानवाधिकारांचे उल्लंघन झालेले नसल्याचे स्पष्ट केले.

स्वामी यांच्या निधनाबाबत विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. तसेच स्टॅन स्वामींच्या निधनाचे वृत्त दु:खदायक आणि अस्वस्थ करणारे असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाने व्यक्त केली. त्यावर केंद्र सरकारने भूमिका मांडली.

‘‘कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातच देशाच्या संस्था कारवाई करतात. त्यामुळे या प्रकरणातही कायद्यानुसारच कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान मानवाधिकारांचे उल्लंघन झालेले नाही’’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.

दरम्यान, स्वामी यांच्या पार्थिवावर मंगळवारी वांद्रे येथील पीटर चर्च येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मानवाधिकार कार्यकर्ते, स्वामी यांचे सहकारी उपस्थित होते.