Actor Vijay party TVK moves Madras High Court after stampede : तमिळनाडूच्या करुर येथे ‘तमिलगा वेत्री कळ्ळगम’ (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख तथा अभिनेते विजय यांच्या सभेला प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या या भीषण घटनेनंतर टीव्हीके पक्षाने चेंगराचेंगरीमागे राजकीय कट असल्याचा आरोप करत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
टीव्हीके पक्षाने रविवारी न्यायमूर्ती एम. धंदापाणी यांच्यासमोर याचिका नमूद करताना या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती देखील केली आहे.
पक्षाचे सह-महासचिव सी.टी.आर. निर्मल कुमार यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली असून सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठासमोर याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
या याचिकेत या घटनेच्या मागे कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेद्वारे किंवा न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
टीव्हीकेने यापूर्वीही पोलिसांवर केले होते आरोप
विशेष बाब म्हणजे ऑगस्ट महिन्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडू पोलीस विनाकारण त्यांच्या रॅलींवर अनेक बंधने लादत असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्यामध्ये गर्भवती महिलांना सहभागी होण्यापासून रोखण्याचा समावेश होता. यावेळी न्यायालयाने पक्षाला इशारा दिला आणि त्यांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले होते. याचवेळी न्यायालयाने पोलिसांना आणि राज्य प्रशासनाला सर्व राजकीय पक्षांसाठी जाहीर सभा आयोजित करण्याकरिता निश्चित केलेल्या अटींसह एक समान प्रणाली तयार करण्याची सूचनाही केली होती.
न्यायालयाने त्या वेळी असेही म्हटले होते की, टीव्हीके पक्षाचे प्रमुख म्हणून विजय यांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या सुरक्षित आयोजनाची काळजी घेतली पाहिजे आणि गर्भवती महिला तसेच दिव्यांग व्यक्तींना अशा सभांपासून दूर राहण्यास सांगून एक ‘उदाहरण घालून दिले पाहिजे’.