लॉस एंजेलिस : ‘ॲनी हॉल’, ‘द गॉडफादर’चे तीन भाग आणि ‘फादर ऑफ द ब्राइड’ या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या, ऑस्कर विजेत्या अभिनेत्री डाएन कीटन यांचे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या.
‘पीपल मॅगेझिन’ने शनिवारी त्यांच्या निधनाचे वृत्त देताना नमूद केले की, कॅनडामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे प्रियजन होते. इतरांपेक्षा वेगळी शैली आणि उत्साह यामुळे डाएन कीटन यांचा पडद्यावरील वावर उठून दिसत असे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनोरंजन जगताला धक्का बसला आहे.
‘द फर्स्ट वाइव्ज क्लब’मध्ये कीटन यांच्याबरोबर अभिनय केलेल्या बेट मिडलर यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, “डाएन विनोदी, अस्सल आणि निष्कपट होत्या. एखाद्या स्टारकडे असलेली स्पर्धात्मकता त्यांच्यामध्ये अजिबात नव्हती. त्यांना पाहूनच आम्ही हरखून जात असू.”
डाएन यांच्या ‘ॲनी हॉल’ या चित्रपटातील अभिनयाला ऑस्कर पुरस्काराने दाद मिळाली होती. त्यानंतर ‘रेड्स’, ‘मार्विन्स रूम’ आणि ‘समथिंग गॉट्टा गिव्ह’ या चित्रपटांसाठी त्यांना ऑस्करचे मानांकन मिळाले होते.