वृत्तसंस्था, बंगळूरु
अब्जाधीश उद्याोगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी भारतात इराणमधून एलपीजी गॅस आयात केला आहे का याची चौकशी अमेरिका करत असल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने सोमवारी दिले. अदानी समुहाने मात्र हे वृत्त फेटाळले असून हा आरोप पूर्णपणे निराधार आणि खोडसाळ असल्याचे त्यांनी सांगितले.
अदानी समूहाच्या मुंद्रा बंदरामार्गे इराणमधून एलपीजी भारतात आयात झाला आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अमेरिकी अधिकारी करत आहेत. काही टँकर नियमितपणे मुंद्रा आणि पर्शियन गल्फ आखातादरम्यान ये-जा करत होते. या टँकरच्या हालचालींवरून असे दिसून आले की ते निर्बंधांचे उल्लंघन करत आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे.
अमेरिकी न्याय विभाग अदानी समूहाला मालवाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक एलपीजी टँकरच्या क्रियाकलापांचा आढावा घेत आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांचा हवाला देत ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने वृत्त दिले आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही देशाने किंवा व्यक्तीने इराणी तेल किंवा पेट्रोकेमिकल उत्पादनांची खरेदी केल्यास त्यांच्यावर तात्काळ दुय्यम निर्बंध लादले जातील, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत प्रकाशित झालेल्या या वृत्ताला महत्त्व प्राप्त झाले आहे.
उद्योग समूहाने आरोप फेटाळले
इराणी एलपीजीशी संबंधित निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा किंवा या व्यापारात जाणूनबुजून सहभाग असल्याचा आरोप‘अदानी समूहा’ने नाकारला. कंपनीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सांगितले की या विषयावर अमेरिकी अधिकारी चौकशी करत असल्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. हे आरोप निराधार असून कायदेशीर मार्गांनी उत्तर देण्यात येणार आहे.