कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संघटनांनी २०१९-२० या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांना ९२१.९५ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या. भाजपाला सर्वाधिक ७२०.४०७ कोटी रुपये मिळाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM) ने या कालावधीत कॉर्पोरेट देणग्यांमधून कोणतेही उत्पन्न दाखवलेले नाही. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात ही माहिती समोर आली आहे.


त्यात म्हटलंय की, २०१७-१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षांमध्ये कॉर्पोरेट्सकडून राष्ट्रीय पक्षांच्या देणग्यांमध्ये १०९ टक्के वाढ झाली आहे. राजकीय पक्षांनी एका आर्थिक वर्षात २०,००० रुपयांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या देणगीदारांची जी माहिती निवडणूक आयोगाला दिली होती, त्या माहितीवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.


एडीआरने पाच पक्षांच्या देणग्यांचे विश्लेषण केले. यामध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP), ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी – मार्क्सवादी (CPM) यांचा समावेश आहे. प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने २०१९-२० मध्ये भाजपा आणि काँग्रेसला सर्वाधिक देणग्या दिल्याचे अहवालात म्हटले आहे. ट्रस्टने एका वर्षात ३८ वेळा दोन्ही पक्षांना २४७.७५ कोटी रुपयांची देणगी दिली.
भाजपाला प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून २१६.७५ कोटी रुपये आणि काँग्रेसला ३१ कोटी रुपये मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे. बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने २०१९-२० मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक दान दिले. दरम्यान, प्रुडंट हा सर्वात श्रीमंत इलेक्‍टोरल ट्रस्‍ट असून २०१३-१४ पासून भाजपाच्‍या सर्वात मोठ्या फंडर्सपैकी एक आहे. इलेक्टोरल ट्रस्टला सुमारे ९० टक्के कॉर्पोरेट देणग्या त्यांच्याकडे जातात.

अहवालानुसार, २०१२-१३ ते २०१९-२० या कालावधीत, राष्ट्रीय पक्षांना २०१९-२ मध्ये १७ व्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वाधिक ९२१.९५ कोटी रुपयांची कॉर्पोरेट देणगी मिळाली. त्यानंतर २०१८-१९ मध्ये ८८१.२६ कोटी रुपये आणि २०१४-१५ मध्ये १६ व्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ५७३.१८ कोटी रुपये मिळाले होते. २०१२-१३ आणि २०१९-२० दरम्यान केलेल्या एकूण देणग्यांपैकी २०१९-२० मध्ये कॉर्पोरेट देणग्या २४.६२ टक्के आहेत. २०१२-१३ आणि २०१९-२० दरम्यान, कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संस्थांकडून राष्ट्रीय पक्षांना देणग्या १,०२४ टक्क्यांनी वाढल्या आहेत.