पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली जात असताना नाराजी व्यक्त करणारे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे सूर आता जुळू लागले आहेत. मतदानातील नकाराधिकाराबरोबरच (‘नन ऑफ द अबव्ह’ हा पर्याय) मतदान सक्तीचे करावे, या मोदी यांनी व्यक्त केलेल्या मताला आपला पाठिंबा आहे असे अडवाणी यांनी म्हटले आहे.
अडवाणी यांनी ब्लॉगवर सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना नकाराधिकार देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे तथापि, त्यांनी पुढे असे म्हटले आहे, की या तरतुदीबरोबरच मतदान सक्तीचे करण्यात यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यघटनेने दिलेला मतदानाचा मोलाचा अधिकार न वापरण्याचे कोणतेच कायदेशीर स्पष्टीकरण नाही, ते त्यांचा तसा हेतू अपेक्षित नसताना यापैकी कोणीही नको या पर्यायाचे बटण दाबू शकतील, असे अडवाणी म्हणतात. त्यामुळे जर मतदान सक्तीचे केले असते तर या नकारात्मक मतदानाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त झाला असता, असे अडवाणी यांचे मत आहे गुजरात हे देशात एकच राज्य असे आहे जिथे सक्तीच्या मतदानासाठी पावले उचलली जात आहेत. जगात ३१ देशांत मतदान सक्तीचे करण्यात आले आहे पण केवळ काही देशांतच त्याचा वापर प्रत्यक्षात होतो . निवडणूक आयोगाने सक्तीच्या मतदानाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावून , त्यात  सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व ३१ देशांतील या मतदानसंदर्भातील नियमाबाबतचे कायदे यांची माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली.