नवी दिल्ली : केंद्र सरकार मुद्रित माध्यमांसाठी जाहिरातींच्या दरामध्ये २६ टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे, अशी माहिती माहिती व प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पुढील महिन्यात आदर्श आचारसंहिता हटवली जाईल. त्यानंतर हा निर्णय होणे अपेक्षित आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी जाहिरातींच्या दरांमध्ये नंतर सुधारणा केली जाईल, अशीही माहिती सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

पारंपरिक माध्यमांमध्ये बदल होत असताना हा निर्णय घेतला जात आहे. विशेषतः मुद्रित माध्यमांमधील नोकऱ्या जाण्याच्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी सरकारची सहाय्य करण्याची भूमिका आहे, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी सरकारने २०१९मध्ये जाहिरातींचे दर २५ टक्क्यांनी वाढवले होते. त्यावेळी हा निर्णय वर्तमानपत्राच्या कागदाच्या किंमतीत वाढ, प्रक्रिया शुल्क आणि अन्य घटकांवर आधारित असल्याचे सांगण्यात आले होते. वाहिन्यांच्या जाहिरात दरवाढीसाठी पहिल्या टप्प्यातील सल्लामसलत पूर्ण झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.