Piyush Pandey Passes Away: भारतातील जाहिरात विश्वातील एक प्रभावशाली आणि सर्जनशील व्यक्तिमत्व असलेल्या पियूष पांडे यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. भारतातील जाहिरातींना एक वेगळेपण प्रदान करण्यात पांडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. ओगिल्वी इंडियामध्ये त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ काम केले. पांडे यांनी अनेक गाजलेल्या आणि वर्षांनुवर्षे लोकांच्या स्मरणात राहतील, अशा जाहिराती पांडे यांनी दिल्या. २०१४ साली ‘अब की बार, मोदी सरकार’ हे घोषवाक्य आणि मिले सूर मेरा तुम्हारा हे गाणे लिहिणारे पांडे यांच्या निधनामुळे राजकारणापासून ते जाहिरात क्षेत्र, सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

तरूणपणी सुरुवातीला क्रिकेटपटू, टी टेस्टर आणि बांधकाम मजूर म्हणून काही काळ काम केल्यानंतर पांडे यांनी १९८२ साली ओगिल्वी कंपनीत प्रवेश केला. २७ व्या वर्षी जाहिरात क्षेत्रात पदार्पण करत इंग्रजीचा दबदबा असलेल्या या क्षेत्रात पांडे यांनी आपल्या लेखणीने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. त्यांनी जाहिरातींना दिलेले शब्द भारतीय लोकांना कायमचे लक्षात राहिले.

एशियन पेंट्ससाठी ‘हर खुशी मे रंग लाए’, कॅडबरीसाठी ‘कुछ खास है’, ठंडा मतलब कोका-कोला, फेविकॉल आणि हचसाठी पग श्वानाचे कॅम्पेन अशा कितीतरी उत्पादनांना कायम लक्षात राहतील, अशा जाहिराती पांडे यांनी दिल्या.

कोण होते पियुष पांडे?

पांडे यांचा जन्म १९५५ साली जयपूरमध्ये झाला होता. पियुष पांडे यांचे बंधू प्रसून पांडे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तर बहीण इला अरुण गायिका आणि अभिनेत्री आहे. पांडे यांचे वडील एका बँकेत नोकरी करत होते. पियुष अनेक वर्ष क्रिकेटही खेळत होते.

pandeymonium Piyush pande book
‘पँडेमोनियम’ हे पियूष पांडे यांचे पुस्तक आहे.

पियुष पांडे यांच्या निधनानंतर शोक व्यक्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत पांडे यांना आदरांजली वाहिली. “श्री पियुष पांडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. भारतीय जाहिरात विश्वातील ते एक महान व्यक्ती होते. दररोजच्या जीवनातील संवाद, इथल्या मातीतील विनोदाचे त्यांनी जाहिरातीमध्ये रुपांतर केले. विविध प्रसंगी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांचे काम पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील”, असे सीतारमण म्हणाल्या.

माजी क्रिकेटपटू हर्षा भोगले म्हणाले, “इंग्रजीचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात पियुषने प्रवेश केला आणि त्याने त्याच्या मौखिक भाषेला सुंदररित्या सादर केले. जाहिरातीच्या जगात त्याने उंच भरारी घेतली, पण त्याचे पाऊल कधीही संस्कृती सोडून भरकटले नाहीत. आपल्या रोजच्या जीवनातले संवाद त्याला जाहिरातीसाठी पटकन सुचायचे. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात कर्तुत्ववान व्हायचे असेल तर पियुष पांडे बना. माझ्या मित्राला अखेरचा निरोप.”