तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तिथं अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. नुकतंच भारतीय वायू दलाने अफगाणिस्तानमधील संघर्षजन्य आणि भीतीदायक परिस्थितीत रविवारी १०७ भारतीयांसह एकूण १६८ जणांना काबूलमधून बाहेर काढून भारतात आणले. यावेळी एका अफगाणी महिलेला देखील आश्रय देत भारतात आणण्यात आलंय. या महिलेनं मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. तसेच अफगाणिस्तानमधून भारतात आणलेल्या काही प्रवाशांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.

“अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती बिघडत होती. तालिबान्यांनी माझं घरं जाळून टाकले म्हणून मी माझी मुलगी आणि दोन नातवंड इथे आलो आहोत. या कठीण प्रसंगात आमचे भारतीय बंधू आणि भगिनी आमच्या मदतीला आले. आम्हाला मदत केल्याबद्दल मी भारताचे आभार मानते.” अशी प्रतिक्रिया एका अफगाणी महिलेनं दिली.

तर, भारतीय वंशाचे अफगाणिस्तानमधील खासदार नरेंदर सिंग खालसा यांना देखील काबूलमधून भारतात परत आणण्यात आलंय. यावेळी बोलताना त्यांना रडू कोसळले. नरेंदर सिंग खालसा म्हणाले की “मला रडायला येतंय. गेल्या २० वर्षांमध्ये मी जे कमवलं ते सगळं संपलंय, नष्ट झालंय.”

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून १६८ जणांना सुरक्षितरित्या भारतात आणल्याची माहिती दिली. तसेच भारत सरकारने अफगाणिस्तानातून परतलेल्यांना मोफत करोना, पोलिओ लस – ओपीव्ही आणि एफआयपीव्ही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानहून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या लोकांचं लसीकरण करण्यात आलंय, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाच्या अंदाजानुसार, ४०० भारतीय अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे करण्याची परवानगी देण्यात आली आहे.