एपी, जलालाबाद
पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या १,४००वर गेली आहे. तर, तीन हजारांपेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहीदने ‘एक्स’वर टिप्पणी करून ही माहिती दिली.

अफगाणिस्तानच्या पूर्व भागाला रविवारी रात्री ६ रिश्टर स्केलचा मोठा धक्का बसला. बचावपथकांचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. हजारो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. येथील अनेक घरे लाकूड, मातीची असल्याने भूकंपाचा धक्का सहन करू शकली नाहीत. येथील दुर्गम भागामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

संयुक्त राष्ट्रांचे अफगाणिस्तानचे निवासी समन्वयक इंद्रिका रावत्ते यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘लोक झोपलेले असताना भूकंप झाल्याने हानी मोठी झाली आहे. तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानातील हा तिसरा भूकंप आहे. यापूर्वी झालेल्या घटना पाहिल्या, की सध्याच्या भूकंपात हानी अधिक असेल, हे स्पष्ट होते.’

तालिबान सरकारला केवळ रशियाने संमती दिली असून, भूकंपाच्या घटनेनंतर विविध देशांना मदतीचे साकडे तालिबानने घातले आहे. मात्र, विविध ठिकाणी सुरू असलेले संघर्ष, युद्ध आणि मदतीसाठीच्या निधीमध्ये झालेली कपात या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानला तातडीने मदत मिळणे जिकिरीचे होत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानमधील मदतीसंदर्भातील समन्वयक केट कॅरे यांनी सांगितले, की निधीमध्ये कपात झाल्यामुळे येथील ४२० हून अधिक सुविधा केंद्रे बंद करण्यात आली आहेत. यातील ८० टक्क्यांहून अधिक केंद्रे पूर्व भागात होती.